लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सराफा आणि इलेक्ट्रॉनिक्स दुकाने व शोरूममध्ये खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी असते. पण सलग दुसऱ्या वर्षीही अक्षय तृतीयेवर कोरोनाचे सावट आणि कडक निर्बंधामुळे सराफा, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, घर खरेदी, वाहन बाजार ब्लॉक झाल्याने जवळपास २०० कोटींची उलाढाल ठप्प राहिली. कोरोनामुळे यंदाही व्यावसायिकांचा मुहूर्त चुकला.
या दिवशी कोणतेही शुभ काम करण्यास नागरिक प्राधान्य देतात. या मुहूर्तावर सोने, वाहन, घर व गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. त्याप्रमाणे काही जण नवीन उद्योग-व्यवसायाचा श्रीगणेशही याच दिवशी करतात. मात्र, यावर्षी कोरोनामुळे बाजारपेठेत कडक निर्बंधामुळे सराफा व वाहन व्यावसायिकांसह अन्य व्यावसायिकांनाही मोठा फटका बसला आहे सराफा बाजार कडकडीत बंद असल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली.
कोरोनामुळे प्लॉट, घर खरेदी-विक्रीच्या बाजारातही तेजी नव्हती. दरवर्षी अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून घर व प्लॉट खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. सलग दुसऱ्या वर्षीही अक्षय तृतीयेवर कोरोनाचे सावट आल्याने घर, प्लॉटचा व्यवसाय ठप्प राहिला. याशिवााय पसंतीचे दुचाकी व चारचाकी वाहन मिळावे, याकरिता ग्राहक अगोदरच बुकिंग करतात. मात्र कडक निर्बंधामुळे वाहन बाजारात मंदीचे वातावरण होते. अनेकजण लॉकडाऊन हटण्याची वाट पाहात आहेत. त्यानंतरच ऑटोमोबाईल बाजारात उत्साह येईल, असे विक्रेत्यांनी सांगितले. याशिवाय या दिवशी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात होते. कडक निर्बंध असल्याने बाजारपेठ बंद आहे. त्याचा फटका इलेक्ट्रॉनिक्स बाजाराला बसला. कोट्यवधींचा फटका बसल्याचे व्यावसायिक श्रीकांत भांडारकर यांनी सांगितले.
दागिन्यांचे ऑनलाईन बुकिंग
राजेश रोकडे म्हणाले, लॉकडाऊन असल्याने जास्त व्यवसायाची अपेक्षा नव्हती. अनेक वर्षांपासून जुळलेल्या ग्राहकांनी दागिने आणि नाण्यांची ऑनलाईन बुकिंग केले. या माध्यमातून अक्षय तृतीयेला सोने खरेदीची परंपरा ग्राहकांनी पार पाडली. लॉकडाऊननंतर दागिन्यांची डिलिव्हरी देण्यात येणार आहे. अक्षय तृतीयेला शोरुममध्ये गर्दी असल्याने वेळ मिळत नाही. पण यंदा निवांत वेळ गेला. अनेकांनी नाणे खरेदी करून मुहूर्त साधला. गेल्यावर्षीच्या तुलनेत व्यवसाय फारच कमी झाला.
शटर बंद, पण व्यवसाय सुरू
अनेक व्यावसायिकांनी शटर बंद ठेवून व्यवसाय केल्याची माहिती आहे. नेहमीच्या ग्राहकांना वस्तू उपलब्ध करून दिल्या. पण मनपाच्या एनडीएस पथकाची निगराणी असल्याने शटर बंद होते. पण आत व्यवसाय सुरू होता.