लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : शहरातील मुख्य मार्गालगत फळ, भाजीपाला व इतर वस्तू विक्रेते त्यांची दुकाने थाटत असल्याने वाहतूक काेंडी, किरकाेळ अपघात व त्यातून भांडणे व्हायची. स्थानिक नगर परिषद प्रशासनाने ही सर्व दुकाने हटविली असून, दुकानदारांना व्यवसाय करण्यासाठी स्वतंत्र जागाही उपलब्ध करून दिली. या कारवाईमुळे मुख्य मार्ग माेकळा झाल्याने वाहतूक काेंडीची समस्या सुटल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
नागपूर-ओबेदुल्लागंज (भाेपाळ) मार्ग सावनेर शहरातून गेला आहे. या मार्गाला पर्याय म्हणून बायपास राेड तयार केला असला तरी काही प्रमाणात या मार्गावर शहरातून वाहतूक हाेते. याच मार्गावर शहरातील गडकरी चाैक ते बाजार चाैक दरम्यान राेडच्या दाेन्ही बाजूला फळे, भाजीपाला व इतर वस्तूंची दुकाने थाटली जायची. ग्राहक व त्यांच्या वाहनांमुळे वाहतूक काेंडी व्हायची. त्यातून किरकाेळ अपघात, भांडणे व हाणामारी हाेत असल्याने नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या हाेत्या.
पालिका प्रशासनाने या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत ही संपूर्ण दुकाने गुरुवारी (दि. १०) हटवायला सुरुवात केली. सुरुवातीला पालिकेच्या पालिकेच्या पथकाला दुकानदारांच्या राेषाला सामाेरे जावे लागले. प्रशासनाने त्यांना व्यवसायासाठी लगेच शहरात पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्याने त्यांचा राेष निवळला. ही कारवाई पालिकेचे प्रशासन अधिकारी दिनेश बुधे व मधुकर लोही यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.
...
क्रीडा संकुलाजवळ पर्यायी जागा
नगर पालिका प्रशासनाने ही दुकाने हटविल्यानंतर त्यांना दुकाने थाटण्यासाठी शहरातील सुभाष शाळा व क्रीडा संकुलाच्या सुरक्षा भिंतीलगतची प्रशस्त जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे शहरातील मुख्य मार्ग तूर्तास माेकळा झाला. मात्र, दुकानदार त्यांच्या गाड्या पुन्हा या मार्गालगत उभ्या करू नये, तसेच ग्राहकांनी त्यांच्या गाड्यांसमाेर उभे राहू नये, यासाठी पालिका प्रशासनाने काळजी घेणे आवश्यक आहे. ही काळजी न घेतल्यास परिस्थिती पुन्हा जैसे थेच हाेईल.