नागपूर : विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी सोमवार, २७ सप्टेंबरला भारत बंदचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांच्या मालाला रास्त किंमत मिळावी आणि त्यांच्या विविध मागण्यांच्या समर्थनार्थ व्यापारीसुद्धा त्यांच्यासोबत आहेत. पण, बंदला वेगळे वळण मिळू नये आणि आंदोलनकर्त्यांनी बळजबरीने दुकाने बंद करू नये, असे आवाहन नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी केले आहे.
कोरोना महामारीत व्यावसायिक दुकानदारांना आर्थिक फटका बसला आहे. आता कुठे व्यवसाय पूर्वपदावर येत आहे. अशा परिस्थितीत बळजबरीने दुकाने बंद करण्याची पद्धत योग्य ठरणार नाही. जे व्यावसायिक समर्थनार्थ दुकाने बंद करतील, त्यांचे स्वागत आहे. पण त्यांच्यावर दुकान बंद करण्यासाठी बळजबरी करू नये. व्यापाऱ्यांच्या व्यवसायाचे नुकसान होऊ नये म्हणून याकडे प्रशासन आणि पोलिसांनी लक्ष द्यावे आणि व्यावसायिकांना दिलासा द्यावा, असे आवाहन मेहाडिया यांनी केले आहे.