लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शुक्रवारी सोशल मीडियावर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून इतर सर्व दुकाने शनिवार व रविवारी बंद राहतील, अशी अफवा पसरली. त्यामुळे लोकांमध्ये चर्चा रंगली. शुक्रवारी दिवसभर याचीच चर्चा होती. शेवटी मनपा प्रशासनालाच ‘शनिवार-रविवारी सर्व प्रकारची दुकाने सुरु राहतील. रेस्टारंट, हॉटेलसह इतर सवलतीही कायम राहतील, असे स्पष्ट करावे लागले.
दरम्यान नागपुरात संक्रमण आणखी कमी झाले आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात प्रशासनाकडून आणखीही सूट मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोबतच नियमांचे काटेकोर पालन करणेही बंधनकारक राहील.
सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा वापर आणि मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. दुकानदारांसोबतच ग्राहकांनाही नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
बॉक्स
निर्बंध आणखी शिथिल होतील, पण थोडी प्रतीक्षा करावी लागणार
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, नागपुरात कोरोना संक्रमण खूप कमी झाले आहे. ॲक्टिव्ह केसेसही कमी होत आहेत. आठवडाभरानंतर पुन्हा सूट दिली जाऊ शकते. परंतु अगोदर याचा आढावा घेतला जाईल. शनिवार आणि रविवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू राहतील. अनलॉक अंतर्गत जी सूट मिळालेली आहे ती कायम राहील. नागपूरककरांना संयम पाळत कोविड नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.
बॉक्स
यांनाही मिळाली सूट
मनपा आयुक्तांनी शुक्रवारी सुधारित आदेश जारी केला. यानुसार आधार कार्ड केंद्राला सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
- स्कील डेव्हलपमेंट क्लासेस, कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, आरोग्य कर्मचाऱ्यांचे क्षमता विकास केंद्र यांना २० विद्यार्थी किंवा ५० टक्के क्षमतेने संचालित करण्यास परवानगी मिळाली आहे. एका बॅचनंतर एक तासाची विश्रांती देऊन सॅनिटाईझ करावे लागेल.
- मॉल्समधील रेस्टारंट सुद्धा ५० टक्के क्षमतेने डायनिंग क्षमतेने रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील.