नागपूर : : मेयोच्या डेडिकेटेड कोविड रुग्णालयात रविवारी सकाळी ११.२० वाजेच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट होऊन व्हेंटिलेटर बंद पडल्याने त्यावरील कोरोनाचे २८ वर गंभीर रुग्ण अडचणीत आले होते. रुग्णांना तातडीने दुसऱ्या वॉर्डात हलविण्यात आले. मेयो प्रशासनाने मात्र, शॉर्टसर्किट नसल्याचे सांगून एका व्हेंटिलेटरमुळे वीज ‘ट्रिप’ झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामधील (मेयो) सर्जिकल कॉम्प्लेक्सला ६०० खाटांचे डेडिकेटेड कोविड रुग्णालयाचे स्वरूप देण्यात आले आहे. सध्या येथे कोरोनाचे ३४० रुग्ण भरती आहेत. पहिल्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात (आयसीयू) व्हेंटिलेटरवर सुमारे २८ रुग्ण उपचार घेत होते. सुत्रानूसार, शनिवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे आयसीयूमधील विद्युत दाब कमी जास्त होत होता. सकाळी ११.२० वाजेच्या सुमारास विद्युत कक्षात शॉर्टसर्किट झाले. याची माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांना दिली. पीपीई किट घातलेले डॉक्टरांना नेमके काय करावे, काही कळलेच नाही. त्यांनी लागलीच मेयोच्या बांधकाम विभागातील विद्युत विभागाला याची सूचना दली. या दरम्यान व्हेंटिलेटर बंद पडले होते. व्हेंटिलेटरवरील रुग्णांना तातडीने दुसऱ्या वॉर्डात हलविण्यात आले. साधारण अर्धा तास या भागातील वीज बंद होती, अशी माहिती आहे.
-शॉर्टसर्किट नाहीच
‘लोकमत’शी बोलताना मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया म्हणाले, कोविड रुग्णालयात शॉर्टसर्किट झालेले नाही. एका नादुरुस्त व्हेंटिलेटरमुळे वीज ट्रिप झाली; परंतु खबरदारी म्हणून येथील रुग्णांना दुसऱ्या वॉर्डात हलविण्यात आले आहे. रुग्णांची प्रकृती स्थीर आहे.