रामटेक : शासकीय धान खरेदीला प्रारंभ झाला असून, खुल्या बाजारात धानाचे भाव वाढत आहे. शासनाने धानाला प्रति क्विंटल ७०० रुपयांचा बाेनस देण्याचे जाहीर केले हाेते. त्यासाठी मागील वर्षी ५० क्विंटलची अट घातली हाेती. यावर्षी याबाबत स्पष्ट निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांना धान विकत असल्याने शासकीय धान खरेदीला रामटेक तालुक्यात अल्प प्रतिसाद मिळत आहे.
रामटेक शहरात तालुका खरेदी विक्री संघातर्फे शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रावर आधारभूत किमतीनुसार म्हणजेच १,८६८ रुपये प्रति क्विंटल दराने धानाची खरेदी केली जात असून, या केंद्रावर धान विकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपये बाेनस देण्याची राज्य शासनाने घाेषणा केली हाेती. बाेनससाठी मागील वर्षी ५० क्विंटलची अट ठेवली हाेती. यावर्षी शासनाने या अटीबाबत अद्याप स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
सध्या खुल्या बाजारातील धानाचे दर वाढत आहेत. व्यापाऱ्यांनी २,७०० रुपये प्रति खंडी (दीड क्विंटल) दराने धानाच्या खरेदीला सुरुवात केली हाेती. हे दर आता ३,४५० रुपये प्रति खंडीवर पाेहाेचले आहेत. शासनाकडून याच धानाला सुरुवातीला प्रति क्विंटल १,८६८ रुपये भाव व नंतर ७०० रुपये बाेनस असे २,५०० रुपये मिळणार आहेत. बाेनस सरसकट नसून, त्याला क्विंटलची अट घातली असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
...
एकरी १३ क्विंटलचे लक्ष्य
शासकीय धान खरेदी केंद्रावर मागील वर्षी एकरी २० क्विंटल धान खरेदीचे लक्ष्य ठेवले हाेते. यावर्षी ते एकरी १३ क्विंटल निर्धारित केले आहे. ही बाब शेतकऱ्यांना मान्य नसल्याने त्यांनी एकरी २० क्विंटलचे लक्ष्य कायम ठेवण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. रामटेक तालुक्यात एकूण १,७६८ शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी शासनाकडे नाेंदणी केली आहे. मंगळवार (दि. १)पासून धान खरेदीला सुरुवात झाली असून, केंद्रावर राेज १५ शेतकऱ्यांकडील धानाचे मोजमाप केले जात आहे.