सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : औषध व साहित्य खरेदीचे केंद्रीकरण करण्याचा निर्णय गेल्या वर्षी जुलै महिन्यात मंत्रिमंडळाने घेतला. ‘हाफकिन बायो- फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड’वर याची जबाबदारी दिली. निर्देशानुसार राज्यातील सर्व मेडिकलने हाफकिन कंपनीकडे आपला निधी वळता केला. यात एकट्या नागपूर मेडिकलचे ६१ कोटी तर मेयोचे २९ कोटी रुपये आहेत. परंतु आता वर्ष होत असताना हाफकिनकडून औषधांसह साहित्यही उपलब्ध न झाल्याने रुग्णसेवा अडचणीत आली आहे. रुग्णांना वेठीस धरणारा हा प्रकार असून, हाफकिनला कुणी जाब विचारणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.औषधी व वैद्यकीय उपकरणांचे दर आणि मानके यामध्ये एकसूत्रता आणण्यासाठी आणि दर्जा व गुणवत्ता सुधारण्यास मदत होण्यासाठी याचे केंद्रीकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने जुलै २०१७ रोजी घेतला. राज्यातील प्रत्येक मेडिकलला औषधे व साहित्य खरेदीचा त्यांचा निधी ‘हाफकिन बायो-फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड’कडे वळता करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) औषधांसाठी सुमारे चार कोटी, जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेला १० कोटी, कर्करोगाच्या यंत्रसामुग्रीकरिता २२ कोटी व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या विकासासाठी असलेले २५ कोटी रुपये असे एकूण साधारण ६१ कोटी रुपये हाफकिनकडे वळते केले आहेत. तर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेयो) यंत्रसामुग्रीचे दोन कोटी, औषधे व साहित्याचे दोन कोटी व एमआरआय, सिटीस्कॅनचे २५ कोटी असे एकूण साधारणत: २९ कोटी रुपये हाफकिन कंपनीकडे वळते केले आहेत. परंतु औषधांसह कुठल्याही यंत्रसामुग्रीच्या खरेदीची प्रक्रिया सुरू झाली नसल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, हा निधी मार्च २०१९ पूर्वी खर्च करायचा आहे. यासाठी आता केवळ आठ महिने शिल्लक आहेत. या दरम्यान चित्र बदलेल की तसे राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हाफकिन कंपनीकडून खरेदी प्रक्रियेला उशीर होत असल्याने याचा फटका मात्र गरीब रुग्णांना बसत आहे. मेयो, मेडिकलच्या डॉक्टरांना नाईलाजास्तव रुग्णांच्या नातेवाईकांच्या हाती प्रीस्क्रीप्शन द्यावे लागत आहे.सहा कोटींच्या औषधांची प्रतीक्षामेयो, मेडिकलला औषध व साहित्य खरेदीसाठी मिळालेल्या अनुदानातून ५० टक्के रक्कम हाफकिन कंपनीकडे वळती केली. यात मेयोचे दोन कोटी १० लाख तर मेडिकलचे तीन कोटी ४६ लाख निधीचा समावेश आहे. परंतु कंपनीकडून आतापर्यंत एक रुपयाचीही औषधे मिळाली नसल्याचे वास्तव आहे.
नागपुरातील मेडिकल-मेयोमध्ये औषधांचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 9:50 AM
औषध व साहित्य खरेदीचे केंद्रीकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. ‘हाफकिन बायो- फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड’वर याची जबाबदारी दिली. हाफकिनकडून औषधांसह साहित्यही उपलब्ध न झाल्याने रुग्णसेवा अडचणीत आली आहे.
ठळक मुद्देहाफकिनकडे मेयो, मेडिकलचे ९० कोटी जमाऔषधांसह साहित्यही उपलब्ध नाही