नागपूर : कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज असताना अनेकांनी ऑनलाईन पोर्टलवरून पोर्टेबल ऑक्सिजन सिलिंडर मागवून रुग्णांची गरज पूर्ण केली. गेल्या दहा दिवसापर्यंत ऑनलाईन ऑक्सिजन सिलिंडर जास्त भावात उपलब्ध होते. पण आता ऑनलाईनवर ‘आऊट ऑफ स्टॉक’असा संदेश येत असल्याने घरीच सिलिंडर लावून रुग्णाला स्टेबल करण्याच्या त्यांच्या नातेवाईकांचा प्रयत्न आता फोल ठरत आहे.
दहा दिवसापूर्वी ऑनलाईनवर कंपन्यांचे सिलिंडरचे अनेक पर्याय उपलब्ध होते. एक लिटरपासून ३०० लिटरपर्यंत सिलिंडर मिळत होते. तेव्हा लोकांनी अपेक्षेपेक्षा जास्त सिलिंडर खरेदी केले. त्यामुळेच साईटवर सिलिंडर संपल्याने आता ते मिळणे कठीण झाले आहे. सिलिंडर विक्रेते शैलेश राठी म्हणाले, ऑक्सिजनच्या तुटवड्यानंतर दहा दिवसापूर्वी लोकांनी ऑनलाईन अपेक्षेपेक्षा जास्त सिलिंडरची खरेदी केली. तेव्हा सिलिंडर खरेदीसाठी लोकांची चुरस लागली होती. त्यामुळे मागणी ५०० पट वाढली. त्यामुळे विक्रीसाठी माल कमी पडू लागला. अनेकांनी संकटकाळात लागणारे सिलिंडर आधीच खरेदी करून ठेवले आहेत. हे सिलिंडर दीड ते दोन वर्षांपर्यंत उपयोगात येतात. याची किंमत ६०० ते २४०० रुपये आहे. आता विक्रेत्यांकडे स्टॉक नसल्याने ऑनलाईनवर आऊट ऑफ स्टॉक असा संदेश मिळत आहे. कुणाला सिलिंडर मिळाले तर त्याचे भाग्य समजावे. पण अनेकांच्या निराशा पदरी पडत आहे. काही दिवसानंतर स्थिती पुन्हा सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.