- रुग्णालयांना होत असलेल्या पुरवठ्यात सुधारणा : मंगळवारपर्यंत स्थिती नियंत्रणात येण्याची औषध विक्रेत्यांना आशा
मेहा शर्मा / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेमडेसिवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी कोरोना संक्रमित रुग्णांच्या नातेवाइकांची प्रचंड धावपळ होत आहे. एका मेडिकल स्टोअरमधून दुसऱ्या मेडिकल स्टोअरकडे पळापळ सुरू आहे. परंतु, इंजेक्शनची उपलब्धता नसल्याने निराशाच हाती लागत आहे. किरकोळ विक्रेते व पुरवठादार नवा स्टॉक येण्याची वाट बघत आहेत. मात्र, आता स्थिती सुधारण्यास सुरुवात झाली असून, नेमून दिलेल्या कोरोना रुग्णालयांना रेमडेसिवीरचा पुरवठा पुरेशा प्रमाणात वाढला आहे. मंगळवारपर्यंत ही टंचाई संपण्याची आशा असल्याची भावना औषध विक्रेत्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली आहे.
आता आमच्याकडे पुरेसा साठा उपलब्ध झाला असून, गेल्या दोन दिवसांपासून भेडसावत असलेल्या समस्येतून सुटका झाल्याचे वसंत मेडिकलचे संचालक मनोज गोलावार यांनी सांगितले. सकाळपासून शंभराहून अधिक लोक रेमडेसिवीरसाठी माझ्याकडे आले. मात्र, संपूर्ण स्टॉक कोरोना रुग्णालयांकडे पाठविण्यात येत असल्याने त्यांना देता आले नाही. तरीदेखील रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याच्या स्थितीत आणि डॉक्टर रेमडेसिवीर लिहून देत असतील तर किरकोळ औषध विक्रेत्यांनी ते द्यावे, असे मत गोलावार यांनी व्यक्त केले.
आमच्याकडे साठा होता. मात्र, तो साठा जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या ताब्यात घेतल्याने नागरिकांना गैरसोईचा सामना करावा लागला. आम्ही केवळ रुग्णालयांनाच पुरवठा करू शकत असल्याचे सुरेश मेडिकलचे संचालक सुशील केवलरामानी यांनी सांगितले. सकाळपासून दोन हजारांच्या वर रेमडेसिवीरच्या ग्राहकांना परत पाठवावे लागल्याचे त्यांनी सांगितले. हॉस्पिटल्सकडे रेमडेसिवीर उपलब्ध असले तरी बेड्स रिकामे नाहीत. त्यामुळेच, प्रिस्क्रिप्शन म्हणून डॉक्टर्स रुग्णांच्या नातेवाइकांना रेमडेसिवीर बाहेरून घेण्यास सांगत आहेत. त्यामुळेही तुटवडासदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे केवलरामानी यांनी सांगितले.
बॉम्बे हॉस्पिटलचे कार्तिक नायर यांनी रविवारपर्यंत रेमडेसिवीरचा पुरवठा होण्याची अपेक्षा असून, ते रुग्णांना उपलब्ध होतील, असे सांगितले. कोरोना रुग्णालयांनाच रेमडेसिवीर देण्यात येत असल्याने बाजारात तुटवडा निर्माण झाला असून, रविवारपर्यंत आमच्याकडे स्टॉक उपलब्ध होताच सोमवार-मंगळवारपासून परिस्थिती आटोक्यात येईल, अशी आशा सचिन मेडिकलचे संचालक सचित बडजाते यांनी सांगितले. त्यामुळे, नागरिकांनी थोडा संयम बाळगावा आणि चिंतामुक्त व्हावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
..................