लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील काही दिवसांपासून नागपुरात स्टॅम्प पेपरचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यामुळे मुद्रांक खरेदीसाठी नागरिकांच्या रांगाच रांगा लागत आहे. मुद्रांकांचा काळाबाजारही वाढला आहे. याचा सर्वाधिक फटका नागरिकांना बसत आहे.
विविध शासकीय कार्यालयांशी निगडित प्रतिज्ञापत्रे, संमतीपत्र आदी शासकीय कामकाजांसाठी कोर्ट फी, स्टॅम्प पेपरची नागरिकांना आवश्यकता असते. परंतु मागील काही दिवसांपासून नागरिकांना मुद्रांकासाठी चांगलीच धावपळ करावी लागत आहे. विचारणा केली तर स्टॅम्प संपले असे सांगितले जाते. स्टॅम्पसाठी रांगा लागत आहे. काही जण याचा गैरफायदा घेऊन मुद्रांक चढ्या दराने विकत आहे. १०० रुपयांचे मुद्रांक २०० रुपयांपर्यंतही विकले जात आहेत.
यासंदर्भात कोषागार विभागाकडे विचारणा केली असता असे सांगितले की, कोरोनाकाळापासून मुद्रांकाचा पुरवठाच कमी येत आहे. मे महिन्यात १२ कोटीचे मुद्रांक आले होते. चार महिने माल पुरवावा लागतो. ते आतापर्यंत पुरविले. एकूण ५५ परवानाधारक मुद्रांक विक्रेते आहेत. त्या सर्वांना पुरवठा व्हावा, या दृष्टीने नियोजन करावे लागते. परंतु काही विक्रेते हे जाणीवपूर्वक तुटवडा निर्माण करीत असल्याचेही सांगितले जाते. परंतु दुसरीकडे परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, आम्हाला मुद्रांकच कमी भेटत आहे, माल असूनही दिला जात नसल्याचा त्यांचा आरोप आहे.
बॉक्स
- पुरवठा नियमित होताच परिस्थिती सुधारेल
सध्या पुरवठा कमी असल्याने एका विक्रेत्याला आठवड्यात ८० हजारांचा माल देण्यात येत होता. २५ कोटींच्या मुद्रांकांची मागणी केली होती. परंतु ११ कोटीचेच मुद्रांक आले. त्यामुळे आता आठवड्यात दोन लाखापर्यंत मुद्रांक विक्रेत्याला दिले जाईल, यातून परिस्थितीत सुधारणा होईल.
अरविंद गोडे, प्र. वरिष्ठ कोषागार अधिकारी
-बॉक्स
मुद्रांकांचा पुरवठाच कमी
विक्रेत्यांना मुद्रांकांचा पुरवठाच कमी होत आहे. त्यामुळे लाेकांची गैरसोय होत आहे. हा पुरवठा नियमित झाल्यास अडचण दूर होईल. राज्यात दुसरीकडे कुठेही पुरवठा कमी नाही मग नागपुरातच का? माल असूनही दिला जात नाही.
सतीश पाटील, अध्यक्ष, विदर्भ लायसन्सधारक मुद्रांक विक्रेता संघटना