कामठी : येथील प्रभाग १५ मध्ये उद्यापासून आयोजित करण्यात आलेले ज्येष्ठ नागरिकांचे दोन दिवसीय लसीकरण शिबिर लसींच्या तुटवड्यामुळे पुन्हा एकदा रद्द करण्यात आले असल्याची माहिती नगरपरिषदेचे अधीक्षक आबासाहेब मुढे यांनी दिली.
नगरपरिषद प्रशासनाने प्रभाग १ ते १६ मध्ये लसीकरणाचे वेळापत्रक जाहीर केले होते. प्रत्येक प्रभागात २ दिवस लसीकरण करण्यात येणार होते. त्यानुसार प्रभाग १५ तील न.प. शाळेत ४ आणि ५ मेला ४५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण होणार होते. परंतु ते लसीकरण पुढे ढकलण्यात आले होते. दरम्यान, लसींचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्याने सुधारित वेळापत्रकानुसार ८ आणि ९ मे रोजी लसीकरण होणार होते. स्थानिक लोकप्रतिनिधीनी लसीकरण बाबतची माहिती विविध समाज माध्यमातून प्रभागातील नागरिकांना दिली. मात्र शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता न.प. प्रशासनाने या प्रभागात ८ वे ९ रोजी होणारे लसीकरण लस उपलब्ध नसल्याने रद्द झाल्याचे सांगितले.
--
कोरोनाचा हाहाकार उडाला असताना व लसीकरण हा एकमेव उपाय असताना न.प. प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. आधी लसींची उपलब्धता निश्चित करावी त्यानंतरच लसीकरण शिबिर जाहीर करावे.
- संध्या उज्ज्वल रायबोले
नगरसेविका, प्रभाग १५