उमरेड : बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर १८ वर्षे वयोगटावरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. २१ जूनला आदेश धडकले तर २२ जूनपासून १८ वर्षावरील लसीकरण सुरू झाले. मागील काही दिवसापासून लसीकरण धडाक्यात सुरू असताना, आज साेमवारी (दि.२८) सकाळीच उमरेड तालुक्यातील सर्वच केंद्रावरील कोरोना लसींचे डोस संपले. यामुळे नागरिकांची घोर निराशा झाली.
तालुक्यातील बेला, सिर्सी, मकरधोकडा, पाचगाव तसेच उमरेड ग्रामीण रुग्णालयासह शहरात अन्य काही ठिकाणी नियमितपणे लसीकरण सुरू होते. आजपर्यंत तालुक्यात पहिला आणि दुसरा डोस घेणाऱ्यांची एकूण संख्या ७०,४५९ आहे. दरम्यान, साेमवारी उमरेड तालुक्याला केवळ ३० व्हायल म्हणजेच ३०० डोस लसीकरणाचे मिळाले. ते लगेच संपले. मुंबई, पुण्याचा प्रवास करीत लस नागपूरला पोहोचविल्या जात आहे. मागणीपेक्षा पुरवठा फारच कमी होत असल्याने ही समस्या उद्भवली असल्याचे बोलले जात आहे. तातडीने लस उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांची आहे.