नागपूर विद्यापीठ : ‘एलएलएम’चे वेळापत्रक चुकीच्या ठिकाणी ‘अपलोड’नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कामकाज ‘आॅनलाईन’ होत असले तरी लहान लहान चुकांमुळे विद्यार्थ्यांना फटका बसतो आहे. ‘एलएलएम’चे वेळापत्रक संकेतस्थळावर योग्य ठिकाणी ‘अपलोड’ करण्यात आले नाही. यामुळे अभ्यासक्रमाच्या काही विद्यार्थ्यांचे पहिले दोन पेपरच हुकल्याची बाब समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे संबंधित महाविद्यालयानेदेखील विद्यार्थ्यांना वेळापत्रक किंवा परीक्षेबाबत कुठलीही माहिती दिलेली नव्हती.नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक संकेतस्थळावर टाकण्यात येते. विद्यार्थीदेखील नियमितपणे संकेतस्थळ पहात असतात. ‘एलएलएम’च्या द्वितीय सत्राचा निकाल जाहीर झाला नाही म्हणून विद्यार्थ्यांकडून एकमेकांना विचारणा करण्यात येत होती. एका खासगी विधी महाविद्यालयातील विद्यार्थी तर यामुळे संभ्रमात पडले होते. २४ मे रोजी यातील एका विद्यार्थिनीला अचानक धक्काच बसला. संकेतस्थळावर कुठलेही वेळापत्रक जाहीर झाले नसताना चक्क दोन पेपर होऊन गेल्याचे तिला समजले. यासंदर्भात विद्यापीठात चौकशी केल्यावर पेपर २० मे रोजीच सुरू झाल्याचे कळले. याबाबत अधिक माहिती काढली असता विद्यापीठाने संकेतस्थळावर वेळापत्रक तर जाहीर केले होते. परंतु ते वेळापत्रक ‘एलएलबी’च्या ‘लिंक’वर ठेवण्यात आले होते. साहजिकच ‘एलएलएम’च्या काही विद्यार्थ्यांना वेळापत्रक जाहीर झाल्याचे कळलेच नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संबंधित खासगी महाविद्यालयानेदेखील विद्यार्थ्यांना कळविण्याची तसदी घेतली नाही. परंतु यामुळे काही विद्यार्थ्यांना पेपरला मुकावे लागले.यासंदर्भात परीक्षा नियंत्रक डॉ. नीरज खटी यांना संपर्क केला असता त्यांनी चौकशी केली. तांत्रिक घोळामुळे ‘एलएलबी’च्या ‘लिंक’वर ‘एलएलएम’चे वेळापत्रक टाकण्यात आल्याचे त्यांनी मान्य केले. परंतु विद्यार्थ्यांना वेळापत्रकाबाबत कळविणे महाविद्यालयांची जबाबदारी आहे. ते त्यांनी करायला हवे होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.(प्रतिनिधी)
संकेतस्थळावरील चुकीचा विद्यार्थ्यांना फटका
By admin | Published: May 28, 2016 2:57 AM