नागपूर : अटकपूर्व जामीन अर्जावरील अंतिम सुनावणीचे वेळी आरोपीला उपस्थित राहणे अनिवार्य केले जाऊ शकते का, असा आदेश कोणत्या प्रकारच्या आरोपीसंदर्भात द्यायला हवा आणि अशा आदेशामुळे आरोपीचे कायदेशीर अधिकार बाधित होतात का यासह अन्य संबंधित मुद्यांवर मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ दिशादर्शक निर्णय देणार आहे. न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी गुरुवारी या प्रकरणावर २७ जुलै रोजी अंतिम सुनावणी निश्चित केली.
मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संचालन करणाऱ्या व्हीआरजी हेल्थ केयर कंपनीचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. समीर नारायण पालतेवार (वरिष्ठ न्यूरोसर्जन) यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून, सत्र न्यायालयातील अटकपूर्व जामीन अर्जावरील अंतिम सुनावणीचे वेळी त्यांना उपस्थित राहण्याचा आदेश दिला जाऊ शकत नाही, असा दावा केला होता. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या अंतरिम संरक्षणामुळे संबंधित अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्या गेल्यानंतरही त्यांना अटक झाली नाही. पुढे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळवला. परंतु, अटकपूर्व जामीन अर्जावरील अंतिम सुनावणीचे वेळी आरोपीला उपस्थित राहण्याचा आदेश दिला जाऊ शकत नाही, हा पालतेवार यांनी उपस्थित केलेला मुद्दा उच्च न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे. त्यावर सखोल सुनावणीनंतर दिशादर्शक निर्णय दिला जाणार आहे.
पालतेवार यांनी संगणकीय यंत्रणेमध्ये मूळ रकमेपेक्षा कमी रकमेची बिले दाखवून लाखो रुपयांची अफरातफर केली, अशी तक्रार व्हीआरजी हेल्थ केयर कंपनीचे भागधारक गणेश चक्करवार यांनी सीताबर्डी पोलिसांकडे केली आहे. त्यावरून २० फेब्रुवारी २०२१ रोजी डॉ. पालतेवार यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४०९ ४०६, ४६५, ४६७, २६८, ४७१ व माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६(सी) अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला आहे. त्यांनी या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. ५ मार्च २०२१ रोजी सत्र न्यायालयाने पालतेवार यांना त्या अर्जावरील अंतिम सुनावणीचे वेळी न्यायालयात उपस्थित राहण्याचा आदेश दिला होता. याकरिता, चक्करवार व तपास अधिकारी यांनी वेगवेगळे अर्ज दाखल केले होते. ते अर्ज मंजूर करण्यात आले होते.
------------------
अटकपूर्व जामिनावर सोमवारी सुनावणी
डॉ. समीर पालतेवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर येत्या सोमवारी न्यायमूर्ती विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे.