पीआर डे साजरा : राधाकृष्ण मुळी यांचे प्रतिपादन नागपूर : सैनिक सीमेवर रात्रंदिवस कठीण परिस्थितीत सुरक्षा करीत असतो म्हणून आम्ही देशात सुखाने जगत असतो, झोपत असतो. अशा सैन्याबद्दल नेहमी कृतज्ञतेचा भाव ठेवलाच पाहिजे, असे प्रतिपादन नागपूर व अमरावती विभागाचे माहिती संचालक राधाकृष्ण मुळी यांनी केले. पब्लिक रिलेशन सोसायटी आॅफ इंडिया, नागपूर चॅप्टर आणि लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने नॅशनल पीआर डेनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जवाहरलाल आर्ट गॅलरीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विंग कमांडर समीर गंगाखेडकर, लोकमतचे संचालक तथा निवृत्तविंग कमांडर रमेश बोरा, जिल्हा सैनिक अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे व पब्लिक रिलेशन सोसायटी आॅफ इंडिया, नागपूर चॅप्टरचे अध्यक्ष एस. पी. सिंग उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘सुकमा’ व ‘जम्मू-काश्मीर’मधील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर पीआर गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विंग कमांडर समीर गंगाखेडकर यांनी आपले विचार व्यक्त करताना वायुसेनेतील त्यांचे अनुभव कथन केले. ते म्हणाले, सुरुवातीचे १८ वर्षे परिवारापासून दूर होतो. त्यादरम्यान परिवारातील एखाद्या सदस्याला माझ्याशी संपर्क साधून बोलण्याची कितीही इच्छा झाली तरी ते शक्य नव्हते. मी त्यांना जेव्हा फोन करीत होतो, तेव्हाच तो संपर्क होत होता, असे त्यांनी सांगून देशातील तिन्ही सेनेसह डिफेन्स आणि डीआरडीओसारख्या संस्थांचे विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.निवृत्त विंग कमांडर रमेश बोरा यांनी सैनिकी जीवनातील शिस्त, निर्णयक्षमता, अनुभव आणि आत्मविश्वास संपूर्ण जीवनभर व्यक्तीला कामी येत असल्याचे सांगितले. संचालन अमोल मौर्य यांनी केले तर एस. पी. सिंग यांनी आभार मानले.(प्रतिनिधी) मोहिते यांना ‘बेस्ट पीआर’ पुरस्कार महाजनकोचे जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते यांना ‘बेस्ट पीआर प्रॅक्टिशनर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. महावितरणचे जनसंपर्क अधिकारी योगेश विटणकर यांचा मुलगा आर्यनने अवघ्या नवव्या वर्षी लष्करावर तयार केलेली एक छोटी फिल्म दाखविण्यात आली. तसेच यशवंत मोहिते यांचा मुलगा मंदार मोहिते याने आजची तरुण पिढी ही राष्ट्रीय उत्सव कसा साजरा करतात, याविषयी सांगितले. आर्यन आणि मंदार यांचाही सत्कार करण्यात आला.
सैन्याबद्दल कृतज्ञतेचा भाव असावा
By admin | Published: April 28, 2017 3:05 AM