योगेश पांडे नागपूर : समृद्धी महामार्गावर झालेल्या बस अपघातावरून राज्यात राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'देवेंद्रवासी' या वक्तव्यावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शरद पवारांनी राजकारणाची खालची पातळी गाठली असून त्यांच्या कार्यकाळात मृत झालेल्यांना 'शरदवासी' असे म्हणायचे का असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात त्यांनी शनिवारी रात्री ट्वीट केले.
समृद्धी महामार्गावरील अपघात अतिशय दुर्दैवी घटना आहे. संपूर्ण महाराष्ट्र शोक करतो आहे. हा अपघात आहे. समृद्धी महामार्गाला सर्वोत्तम महामार्ग करण्यासाठी देवेंद्र फडणवीस जीवाचे रान केले. लाखो प्रवासी या मार्गाचा उपयोग करत आहेत. देशातील अनेक महामार्गावर अपघाताच्या अनेक घटना घडल्या. अपघात कधीही घडू शकतो. मात्र फडणवीस यांचा व्यक्तिगत विरोध करताना पवार यांनी खालची पातळी गाठली. पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात झालेल्या प्राणघातक घटना ते सोयीस्कर विसरले. मुंबईवरचा दहशतवादी हल्ला, गोवारींची चेंगराचेंगरी , मावळचा गोळीबार या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात झाल्या होत्या.या सगळ्या घटनांनी महाराष्ट्राच्या मनावर कायमचे ओरखडे उमटले व अजूनही जखमा ओल्या आहेत. मग या घटनांत मृत्यूमुखी पडलेले सगळेच "शरदवासी" म्हणायचे का असा सवाल बावनकुळे यांनी केला.