नागपूर : रासायनिक घटकांसह कागदाच्याही किमती वाढल्यामुळे आणि टाकाऊ पेपरचीही कमतरता असल्याने त्यापासून तयार हाेणाऱ्या वस्तूंच्याही किमती वाढल्या आहेत. याचा परिणाम फटाक्यांवरही दिसून येत आहे. यावर्षी फटाक्यांच्या किमती २५ ते ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे उत्साहासाठी फटाके खरेदी करणाऱ्यांना महागाईच्या झळा साेसाव्या लागत आहेत. घरात किराणा घेतला, अर्धा खर्च फटाक्यांवरच करावा लागत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडत आहे.
- २५ ते ३० टक्के दरवाढ
काेराेनानंतर वेस्ट पेपरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला हाेता. त्यामुळे फटाके निर्मितीसाठी आवश्यक कागद मिळण्यास अडचणी आल्या. या टाकाऊ कागदांच्या किमतीमध्ये ४० टक्के वाढ झाली. शिवाय फटाक्यात लागणारे रासायनिक घटकांच्या किमतीतही भरमसाठ वाढ झाली आहे. याचा परिणाम फटाक्यांवर पडला. प्रत्येक प्रकारचे फटाके २५ ते ३० टक्क्यांनी महाग झाले आहेत. मुलांना आवडणाऱ्या फॅन्सी फटाक्यांमध्ये ४० टक्क्यांपर्यंत किमतीत वाढ झाली आहे.
- फॅन्सी फटाक्यांना पसंती
फॅन्सी फटाके विशेषत: लहान मुलांच्या पसंतीचे असतात. अनेक रंगांची उधळण करणारा अनार, जंबाे अनार, वेलकम, बल्लेबल्ले अनार तसेच फुलझडी, तिरंगा अनार, चक्री आदी फटाक्यांचा समावेश असताे. मात्र, एका विक्रेत्याच्या माहितीनुसार या फटाक्यांची कमतरता यावर्षी जाणवत आहे.
- शिवकाशीवरून येतात फटाके
- देशात फटाक्यांचे सर्वाधिक उत्पादन हे तामिळनाडूच्या शिवकाशी येथे हाेते. शिवकाशीवरून सर्वत्र पुरवठा केला जाताे. नागपुरात येणारा ७० टक्के माल शिवकाशीवरून येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. काही फटाके विक्रेत्यांचा स्वत:चा कारखाना आहे; पण तेथे मर्यादीत स्वरूपात उत्पादन हाेते. परसराम फायरवर्कचा मटका अनार, जंबाे अनार, तिरंगा अनार असे फॅन्सी फटाके प्रसिद्ध आहेत.
- दोन सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया
महागाईने प्रत्येक गाेष्टीचे बजेट बिघडविले आहे. त्यामुळे यावेळी नेहमीपेक्षा कमी फटाके घ्यावे लागत आहेत. आम्ही केवळ मुलांच्या आवडीच्या फटाक्यांना प्राधान्य दिले आहे.
- राकेश रणदिवे
उत्सवाची परंपरा म्हणून फटाके घ्यावे लागत आहेत. मात्र, फटाके घेणे आता आवाक्याबाहेर जात आहे. किराण्यापेक्षा जास्त खर्च फटाक्यांचा झाला आहे. नाईलाज आहे; पण यावेळी कात्री लावावीच लागेल.
- हेमंत बनकर
- फटाका व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया
फटाक्यांच्या किमती खराेखर २० ते २५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. वेस्ट पेपर आणि रसायन महाग झाल्याचा हा परिणाम आहे. काही फटाक्यांच्या तुटवड्यामुळेही अडचण जाणार आहे. मात्र, तरीही कमी प्रमाणात का हाेईना लाेकांमध्ये फटाके खरेदीचा उत्साह आहे. पावसामुळे सध्या विक्री कमी आहे; पण वातावरण बदलेल ही आशा आहे.
- ललित कारवटकर, फटाके विक्रेते