नागपूर : गेले काही दिवस थंडी मी म्हणत असतानाच बाजारात द्राक्षे आणि टरबुजे विक्रीला आली आहेत. ही फळे ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. परंतु द्राक्षे, टरबुजे आता खाल्ली तर चालतील का, सर्दी-खोकला तर होणार नाही ना, असा नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत आहे.
यंदा थंडीचा मुक्काम आणखी काही दिवस राहण्याची शक्यता असली तरी बाजारात रसाळ फळांची आवकही सुरू झाली आहे. द्राक्ष, मोसंबी, खरबूज व टरबूज बाजारात दाखल झाले. रात्री थंडी आणि दुपारी उन्हाचे चटकेही जाणवत आहेत. उन्हाचा चटका वाढल्यानंतर मोसमी फळांची मागणीही वाढत असते. यंदा मात्र थंडीचा मुक्काम वाढण्याची चिन्हे असल्याने अद्याप रसाळ फळांना मोठ्या प्रमाणात मागणी नाही. असे असले तरी जानेवारीच्या सुरुवातीपासूनच उन्हाळी फळे बाजारात दाखल झाली आहेत.
- द्राक्षे ८० रुपये किलो
शहरातील सर्वच बाजारात व चौकाचौकात मोसमी फळांची विक्री करणाऱ्या हातगाड्यांवर टरबूजपासून ते द्राक्षांपर्यंत फळे दिसून येत आहेत. सध्या द्राक्षाला ८० रुपये किलो भाव मिळत आहे.
- टरबूज २० रुपये किलो
टरबूज २० रुपये किलो या दराने सध्या विकले जात आहे. एक टरबूज जवळपास ३ ते ४ किलो असते. त्यासाठी ६० ते ८० रुपये मोजावे लागत आहेत.
- थंडी वाढलेलीच
दिवसा कडक ऊन राहत असलेतरी सायंकाळपासून ते सकाळपर्यंत चांगलाच गारवा जाणवतो. शहरात सोमवारी किमान तापमान १४ आणि कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले.
- द्राक्ष, टरबूज आता खावेत का?
वातावरणातील बदलामुळे सध्या सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. द्राक्ष आणि टरबूज ही शीतफळे आहेत. त्यांच्या सेवनाने कफ वाढण्यास हातभार लागतो. त्यामुळे सध्या द्राक्ष, टरबूज खाणे शक्यताे टाळलेले बरे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- शीतफळे खायला हवीत
द्राक्ष, टरबूज ही उन्हाळी फळे असली तरी थंडीतच ती येतात. सध्या थंडी असली तरी ही फळे खावीत. यातून पोषक द्रव्ये मिळतात. कफ वाढत नाही.
- सुनीती खांडेकर, आहारतज्ज्ञ