लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : सरपंचाकडून पैसे घेत असताना तयार करण्यात आलेली व्हिडिओ क्लीप साेशल मीडियावर व्हायरल हाेताच पंचायत समितीतील स्थापत्य अभियंता रंगनाथ पवार यांना खंडविकास अधिकारी संजय पाटील यांनी गुरुवारी (दि. १५) कारणे दाखवा नाेटीस बजावली आहे. दुसरीकडे प्रकरण शमविण्यासाठी दिवसभर सारवासारव करण्याचे प्रयत्न सुरू हाेते.
यासंदर्भात ‘पं. स. कार्यालयात अभियंत्याने कशासाठी स्वीकारले पैसे?’ या शीर्षकाखाली लाेकमतमध्ये गुरुवारी वृत्त प्रकाशित करण्यात आले. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. विराेधी पक्षाने सत्ताधारी राष्ट्रवादी व शेकापच्या कारभारावर टीका करायला सुरुवात केली. पंचायत समितीचा कारभार पारदर्शक आहे. तो व्यवहार परस्पर संबंधातून झाला होता. घरकूलसाठी लाभार्थी निश्चित करताना गैरप्रकार होत नाही, असे स्पष्टीकरण पंचायत समिती सभापती धम्मपाल खोब्रागडे व उपसभापती अनुराधा खराडे यांनी देत रंगनाथ पवार यांची अप्रत्यक्ष बाजू घेतली. ते चांगले कर्मचारी असल्याची पावतीही त्यांनी दिली. व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लीपच्या अनुषंगाने काटाेल शहरात पत्रपरिषद घेण्यात आली. यावेळी व्हिडिओ क्लीप तयार करणारे सुनील देशभ्रतार, क्लीपमधील सरपंच प्रमोद ठाकरे, स्थापत्य अभियंता पवार उपस्थित होते.
...
म्हणे कॅमेरा आपोआप सुरू झाला
पवार व कोहळे यांच्यातील पैशाचा व्यवहार शूट करणारे सुनील देशभ्रतार यांनी आज पलटी खात आपण वैयक्तिक कामासाठी पंचायत समिती कार्यालयात आलो होतो. मोबाईल कॅमेरा आपोआप सुरू झाल्याने ही क्लीप माझ्या मोबाईलमध्ये तयार झाली. ती २ तारखेला सभापती धम्मपाल खोब्रागडे यांचेकडे देऊन शहानिशा करण्याची मागणी केली होती. ती व्हायरल कशी व कुठून झाली याची माहिती नसल्याचे देशभ्रतार यांनी सांगितले. एकूणच या प्रकरणात सर्वांची भूमिका संशयास्पद असल्याने या प्रकरणाची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडून चौकशी करणे गरजेचे आहे.
...
व्हिडिओ क्लीपमधील व्यवहार वैयक्तिक आहे. मी नागपूरला जात असल्याने तपनी येथील सरपंच नितीन गजभिये यांना पैसे देण्याकरिता ते पंचायत समितीतील स्थापत्य अभियंता पवार यांच्याकडे ठेवले होते.
- प्रमोद ठाकरे,
सरपंच, कोहळा
...
प्रमोद ठाकरे व नितीन गजभिये माझे चांगले मित्र आहेत. ठाकरे कामानिमित्त नागपूरला जात असल्याने गजभिये यांना ही रक्कम द्यावी, असे बोलून रक्कम माझ्याकडे सोडली होती.
- रंगनाथ पवार, स्थापत्य अभियंता,
पंचायत समिती, काटाेल.
...