बंटी शेळकेंच्या आरोपांवर काँग्रेसकडून कारणे दाखवा नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 06:31 PM2024-11-30T18:31:07+5:302024-11-30T18:37:56+5:30
Nagpur : नाना पटोले 'आरएसएसचे एजंट’ असल्याचा केला आरोप
नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेसचेनागपूर मध्य मतदारसंघातील उमेदवार बंटी शेळके यांनी नाना पटोले हे ‘आरएसएसचे एजंट’ असल्याचा आरोप केला होता. त्यावर काँग्रेस पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
बंटी शेळके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे हे आरएसएससाठी काम करतात आणि त्यांनी निवडणुकीत मदत केली नसल्याचे आरोप केले आहेत. शेळकेंच्या म्हणण्यानुसार काँग्रेसच्या तिकिटावर ते निवडणूक लढले पण प्रचारात एकही पदाधिकारी त्यांच्यासोबत नव्हता. प्रियांका गांधी रोड शोसाठी नागपुरात आल्या असतानाही पक्षातील कोणीही आले नव्हते. नाना पटोले आरएसएससाठी काम करतात या आरोपांवर बंटी शेळके ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.
बंटी शेळकेंच्या या आरोपांवर काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या आदेशावरून व नाना पटोले यांच्या सुचनेवरून बंटी शेळकेंचे हे कृत्य पक्षशिस्तीचा भंग करणारे असल्याने त्यांना काँग्रेस पक्षातून निलंबीत का करण्यात येऊ नये याबाबत शेळकेंनी लेखी खुलासा दोन दिवसांत प्रदेश कार्यालयात सादर करण्याचे सांगितले. उपरोक्त कालावधीमध्ये शेळकेंनी खुलासा न दिल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे नोटीसमध्ये म्हटले आहे.
महाविकास आघाडीच्या पराभवानंतर पक्षांमधल्या फुटीच्या बातम्यांनी वेग घेतला असतांनाच पक्षातील कार्यकर्त्यांमध्येच वादाचे पडसाद उमटताना दिसत आहेत. बंटी शेळके त्यांनी केलेले आरोप ते मागे घेतात कि त्यांच्या वक्तव्यावर ठाम राहतात हे पाहण्यासारखं असणार आहे.