लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या कुकडे ले-आऊट येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात झालेल्या विद्यार्थ्यांच्या रॅगिंगचे नावावर मारहाण प्रकरणी विभागाने गंभीर दखल घेतली असून वसतिगृहातील गृहपाल यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याचा खुलासा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डिगांबर चव्हाण यांनी केला आहे.कुकडे ले-आऊट येथील शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृहात बी.ए.एम.एस. द्वितीय वर्षातील विष्णू भारत पवार या विद्यार्थ्याला रॅगिंगचे नावावर मारहाण प्रकरणामधील आठ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहे. तसेच वसतिगृहाचे गृहपाल यांनासुध्दा कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबत समिती गठित करण्यात आलेली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त होताच पुढील उचित कार्यवाही तात्काळ करण्यात येईल, असा खुलासा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डिगांबर चव्हाण यांनी केला आहे.