नागपूर : एका ज्येष्ठ महिलेला कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस ‘कोविशिल्ड’चा दिला असताना मेडिकलमध्ये दुसरा डोस ‘कोव्हॅक्सिन’चा देण्यात आल्याचा प्रकार ‘लोकमत’ने सर्वप्रथम उघडकीस आणताच खळबळ उडाली. गुरुवारी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने या प्रकरणासंदर्भात मेडिकलला कारणे दाखवा नोटीस बजावली. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांनी या घटनेला गंभीरतेने घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
आर्वीच्या लसीकरण केंद्रावर एप्रिल महिन्यात तक्रारकर्त्या महिलेने कोविशिल्ड लस घेतली. नुकत्याच त्या नागपुरात मुलीकडे आल्या असता त्या मुलीने स्वत:च्या मोबाइलवरून दुसऱ्या डोससाठी नोंदणी केली. बुधवारी नागपुरात कोविशिल्डचा तुटवडा असल्याने सर्वच सेंटर बंद होते. केवळ कोव्हॅक्सिन केंद्रावर लसीकरण सुरू होते. त्यानुसार त्या महिलेची मेडिकलमध्ये नोंदणी झाली. महिला दुपारी ४ वाजेच्या सुमारास केंद्रावर आली. तिने हा दुसरा डोस असल्याचे न सांगताच लस घेतली. नर्सने हा कोव्हॅक्सिनचा डोस असल्याचे सांगितल्यावर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. लस घेतल्यानंतर त्या महिलेला दोन वेळा उलट्या झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर तिच्या मुलीने अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांना भेटून तक्रार केली. पहिल्या डोसच्या नोंदणीच्या वेळी वेगळा, तर दुसऱ्या डोसच्या नोंदणीच्या वेळी दुसरा मोबाइल नंबर देण्यात आल्याने हा प्रकार घडला असावा, अशी शंका वर्तवली जात आहे. या वृत्ताची दखल घेत महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने मेडिकलला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, नागपुरात हा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. अधिक माहितीसाठी मेडिकलला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मेडिकलने या प्रकरणाचा चौकशीसाठी समिती तयार केली आहे. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.