१६ वर्षीय मुलीवर अत्याचार नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून एका १६ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून अत्याचार केल्याप्रकरणी एका ५० वर्षीय आरोपीला लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायद्याचे (पोक्सो)विशेष न्यायाधीश के. जी. राठी यांच्या न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतून ८ हजार रुपये पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला. ज्ञानेश्वर आखाडू मौजे (५०), असे आरोपीचे नाव असून तो हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैरी पन्नासे येथील रहिवासी आहे. ओळख आणि अल्पवयाचा गैरफायदा घेऊन आपण वडिलाच्या वयाचे आहोत याची जाणीव असूनही आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून पीडित मुलीवर अत्याचार केले होते. ती गरोदर राहिल्याने आपले हे कृत्य उघड होऊ नये म्हणून त्याने मुलीला आपल्या आईसोबत हिंगणा बाजारात गेली असता २७ जानेवारी २०१४ रोजी पळवून नेले होते. पुढे नाव बदलवून तिला पत्नीप्रमाणे ठेवले होते. खासगी इस्पितळात ती बाळंत झाली होती. परंतु मूल अशक्तपणाने मरण पावले होते. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून हिंगणा पोलिसांनी ८ फेब्रुवारी २०१४ रोजी भादंविच्या ३६३, ३६६ (अ), ३७६ (२)(ज), लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करून २६ नोव्हेंबर २०१४ रोजी आरोपीला अटक केली होती. सहायक पोलीस निरीक्षक संतोष खडके यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने आरोपीला भादंविच्या ३६३ कलमांतर्गत ५ वर्षे सश्रम कारावास, ५ हजार रुपये दंड, कलम ३७६ (२)(ज) आणि पोक्सो कायद्यांतर्गत १० वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या दोन्ही शिक्षा आरोपीला एकत्र भोगाव्या लागतील. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी तर आरोपीच्यावतीने अॅड. गिरडे यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल सुनील कडू, भानुदास चिव्हाणे आणि रविकिरण भास्करवार यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)
आरोपीला १० वर्षे कारावास लग्नाचे आमिष दाखवून
By admin | Published: January 18, 2017 2:34 AM