लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - दुचाकीच्या शोरुमचा प्रमुख असलेल्याने बनावट पावती बुक छापून ऑटोमोबाईल्स कंपनीच्या संचालकांना तीन लाख आठ हजाराचा चुना लावला. दीड वर्षांपासून सुरू असलेल्या त्याच्या या बनवाबनवीचा भंडाफोड झाल्यानंतर प्रकरण पोलिसांकडे गेले. राजकुमार प्रदीपराव यावले (वय ३९) असे आरोपीचे नाव आहे.
रामेश्वरीत राहणारा यावले कपिलनगरातील ए.के.गांधी टीव्हीएसमध्ये शोरुम इन्चार्ज होता. त्याने बनावट पावती बुक छापले. पदाचा दुरुपयोग करून ग्राहकांना ती बनावट पावती देऊन तो त्यांची रक्कम कंपनीत जमा न करता परस्पर हडप करू लागला. २९ ऑक्टोबर २०१९ ते २६ जून २०२१ या कालावधीत त्याने अशाप्रकारे कंपनीचे तीन लाख ८ हजार ५४० रुपये हडपले. हा गैरप्रकार उघड झाल्यानंतर त्याला विचारणा केली असता, त्याने कानावर हात ठेवले. त्यामुळे कंपनीतर्फे नवाब आगा खान (वय ४८) यांनी कपिलनगर ठाण्यात बुधवारी तक्रार नोंदविली. पोलिसांनी अफरातफरीचा गुन्हा दाखल केला. आरोपीची चाैकशी सुरू आहे.
----
तीन दिवसात दुसरा गुन्हा
वाहनांच्या शोरुममध्ये काम करणाऱ्यांनी अशाप्रकारे रकमेची अफरातफर केल्याचे उघड झालेले तीन दिवसातील हे दुसरे प्रकरण होय. कपिलनगरमधीलच एका शोरुममध्ये काम करणाऱ्या महिला लेखापालाने संगणकात बनावट नोंदी करून आणि बनावट पावत्या छापून ३१ लाख रुपये लंपास केले. २६ जूनला कपिनलनगर पोलीस ठाण्यातच हा गुन्हा दाखल झाला होता, हे विशेष.
----