लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय वायूदलाने मंगळवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच संघ परिवारातून स्वागत करण्यात आले आहे. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी शहीद जवानांच्या तेरवीचे श्राद्ध योग्य प्रकारेच झाले, असेच वक्तव्य करत या कारवाईवर भाष्य केले.पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी जशास तसे उत्तर द्या असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भूमिका घेण्यात आली होती. मंगळवारी झालेल्या हल्ल्यानंतर संघाकडून अधिकृत भूमिकादेखील जाहीर करण्यात आली. तर सायंकाळी एका कार्यक्रमादरम्यान सरसंघचालकांनी आपली भावना व्यक्त केली. वायुदलाने ज्याप्रकारे कारवाई केली आहे, ती पाहता सावरकर यांचे नाव घेण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त झाला आहे, असे डॉ.मोहन भागवत म्हणाले.तर सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनीदेखील वायुसेना तसेच केंद्र सरकारचे अभिनंदन केले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण देशात जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांविरोधात संताप होता. त्यांना कडक प्रत्युत्तर देण्यात यावे, अशीच भारतीय लोकांची इच्छा होती. भारतीय वायुसेनेने कोट्यवधी जनतेच्या भावनांनुसार दहशतवादी तळ उद्धवस्त केले. विशेष म्हणजे यावेळी वायुसेनेने पाकिस्तानी नागरिकांना कुठलीही हानी पोहोचविली नाही. वायुसेनेचे हे कार्य भारतीय सभ्यतेनुसारच झाले आहे. यासाठी त्यांचे अभिनंदन असल्याचे मत भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले आहे.मोदींनी दृढ राजकीय इच्छाशक्ती दाखविलीराष्ट्रसेविका समितीतर्फेदेखील या ‘एअरस्ट्राईक’बाबत प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भारतीय वायुसेनेने केलेल्या कामगिरीचे अभिनंदनच व्हायला हवे. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याला कारवाईसाठी खुली सूट दिली हेदेखील महत्त्वाचे आहे. यातून त्यांनी दृढ राजकीय इच्छाशक्ती दाखवून दिली आहे. जर कुणी देशाकडे वाकडी मान करुन पाहिले तर त्याला योग्य प्रत्युत्तर देण्यात येईल, हे या ‘स्ट्राईक’मधून सांगण्यात आले आहे. संरक्षण दलांनी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे व शत्रूला कुठलीही मनमानी करु दिली जाणार नाही, असे कारवाईतून दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन प्रमुख संचालिका शांताक्का यांनी केले आहे.
शहीद जवानांचं तेरावं योग्य प्रकारे झालं- मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 9:51 PM
भारतीय वायूदलाने मंगळवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच संघ परिवारातून स्वागत करण्यात आले आहे. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी शहीद जवानांच्या तेरवीचे श्राद्ध योग्य प्रकारेच झाले, असेच वक्तव्य करत या कारवाईवर भाष्य केले.
ठळक मुद्दे ‘एअर स्ट्राईक’चे संघ परिवारातून स्वागत