लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जन्मजात कर्णबधिर असलेल्या मुलांसाठी ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ महत्त्वाचे ठरते. परंतु ‘स्किम आॅफ असिस्टन्स टू डिसेबल पर्सनस फॉर परचेस’ या योजनेंतर्गत रुग्णाच्या एकाच कानासाठी हे यंत्र उपलब्ध करून दिले जात आहे. शिवाय, यात शस्त्रक्रियेनंतरच्या आवश्यक देखभालीसाठी विशेष योजना नाही. या संदर्भातील विस्तृत चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केली. त्यांनी या समस्या सोडविण्यासाठी ‘श्रवणीत महाराष्ट्र’ ही नवी योजना सुरू करण्याची ग्वाही दिली, अशी माहिती पंडित दीनदयाल इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स, रिसर्च अॅण्ड ह्युमन सोर्सेसचे संचालक डॉ. विरल कामदार यांनी येथे दिली.इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ बाह्यरुग्ण विभागाचे (ओपीडी) गुरुवारी उद्घाटन झाले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला आमदार विकास कुंभारे, आमदार डॉ. मिलिंद माने, अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे व कान, नाक व घसा विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदी उपस्थित होते.शासकीय रुग्णालयात ‘आॅडिओलॉजी’ डीग्री व डिप्लोमा सुरू करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याची माहितीही यावेळी डॉ. विरल कामदार यांनी दिली. आ. कुंभारे म्हणाले, राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ ओपीडी सुरू होण्याचा मान नागपूरच्या मेयो रुग्णालयाला मिळाला आहे. याचा फायदा रुग्णांना होईल. या विभागासाठी लागणाऱ्या आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न केले जाईल, असेही ते म्हणाले.यावेळी आ. डॉ. मिलिंद माने यांनीही आपले विचार मांडले. अधिष्ठाता डॉ. श्रीखंडे यांनी ‘कॉक्लीअर इम्प्लांट’बाबत जनसामान्यात जनजागृती करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक डॉ. वेदी यांनी केले. ते म्हणाले, आठवड्यातून एक दिवस म्हणजे, मंगळवारी कॉक्लीअर इम्प्लांट ओपीडी सुरू राहील. यात बालरोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, आॅडिओलॉजिस्ट व इएनटी तज्ज्ञ एकत्र बसून रुग्णांची तपासणी करून उपचाराची दिशा ठरवतील. यामुळे रुग्णांना एकाच ठिकाणी अद्ययावत उपचार मिळतील.
राज्यातील जन्मजात कर्णबधिरांसाठी ‘श्रवणीत महाराष्ट्र’ योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 10:21 AM
‘श्रवणीत महाराष्ट्र’ ही नवी योजना सुरू करण्याची माहिती पंडित दीनदयाल इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स, रिसर्च अॅण्ड ह्युमन सोर्सेसचे संचालक डॉ. विरल कामदार यांनी येथे दिली.
ठळक मुद्देविरल कामदार यांची माहिती मेयोच्या ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ ओपीडीचे उद्घाटन