नागपूर, दि. 28 - कोटी कोटी रूप तुझे... या अभंगानुसार ३६ कोटी देवांमध्ये केवळ गणराज हे एकमेव दैवत आहे, ज्याची कित्येक नावे आणि कित्येक रूपे आहेत. त्यांच्या भक्ताला बाप्पा ज्या रूपात हवा आहे, तो त्या रूपात बाप्पाला घडवितो. बाप्पाच्या रूपाबरोबर बाप्पाची नावेही भरपूर आहेत. कलेची उपासिका असलेल्या अंजली शाहू हिने आपल्या कलेद्वारे बाप्पाची रुपे अक्षरातून, अंकातून, रंगातून, नावातून शोधली आहेत. त्याचबरोबर त्यांच्या १०८ नावांना तांदळाच्या दाण्यावर साकारले आहे.म्हाळगीनगरात राहणारी अंजली शाहू ही चित्रकलेची विद्यार्थिनी आहे. श्री गणेशाची निस्सीम भक्त असल्याने, ती आपल्या कलेच्या माध्यमातून दरवर्षीश्री गणेशाच्या प्रती आपली श्रद्धा व्यक्त करते. यावर्षी अंजलीने गणरायाची १०८ नावे तांदळाच्या दाण्यावर कुंचल्याच्या माध्यमातून रेखाटली आहे. कलेच्या क्षेत्रात अंजलीने साकारलेली कलाकृती अतिशय सूक्ष्म आहे.तितकेच बारकावे सुद्धा त्यात आहे. एकाग्रताही तेवढीच आवश्यक आहे. तांदळाच्या दाण्यावर एवढी बारीक कलाकृती तिने केवळ दोन दिवसांमध्येरेखाटली आहे. दरवर्षी अंजली आपल्या कल्पकतेतून श्रीगणेशाचा नाविन्यपूर्ण अविष्कार प्रकट करते. यापूर्वी तिने तांदळाच्या दाण्यावर अष्टविनायकाच्याप्रतिमा साकारल्या होत्या. सध्या ती पेन पेंटिंग या प्रकारातून अतिशय कलात्मक आणि दर्जेदार गणपतीच्या प्रतिमा कॅन्व्हॉसवर साकारत आहे. तिची हीकलाकृती तर रंगांच्या दुनियेत वावरणा-याबरोबरच, सर्वसामान्यांनाही भुरळ घालणारी आहे. अंजलीने सहा भाषेच्या मुळाक्षरांमधून तसेच १ ते १० अंकामधून सुद्धा गणरायाचा शोध घेतला आहे. अंजलीच्या कलेची नोंद इंडिया बुक आॅफ रिकॉर्ड, टॉप वन टष्ट्वेंटी टॅलेंट आॅफ इंडिया, एव्हरेज बुक आॅफरिकॉर्डने घेतली आहे. भूवनेश्वरमध्ये झालेल्या पेंटिंग प्रदर्शनात तिच्या गणपतीच्या कलाकृतीची दखल घेतली गेली आहे. अंजली आपल्या कलाकृतीची नोंदगिनीज बुकमध्ये करण्यासाठी प्रयत्नरत आहे.
- ३६ कोटी देवांगणात गणपती हे असे दैवत आहे, जे कुठल्याही आकारात रूपात घडविता येते. त्यामुळे कलावंतांसाठी गणपती हे अतिशय प्रिय दैवत आहे. कलावंताची त्याच्यावर श्रद्धा असले, तर त्याला फार अवघड जात नाही.- अंजली शाहू, चित्रकार