नागपूर : पौराणिक इतिहासात दंडकारण्याचाच एक भाग म्हणून ओळखल्या जात असलेल्या नागपुरात धार्मिक स्थळेही अनेक आहेत. जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाल येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाच्या शेजारीच श्रीगणपतीचे एक असे देवस्थान आहे, जे भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारे देवस्थान म्हणून ओळखले जाते.
इच्छित फलप्राप्ती झाल्यानंतर श्रीफळ अर्थात नारळाचे हार चढविण्याची परंपरा येथे आहे. संघ कार्यालयातून बाहेर पडताच हे देवस्थान नजरेस पडते. हे जागृत देवस्थान असून याला श्री भुरे बुवांचे गजानन देवघर अर्थात लोकभाषेत नवसाला पावणारा जुन्या शहरातील नागरिकांचा भुऱ्याचा गणपती म्हटले जाते. येथे अगदी शेजारीच नागपूर व्यायाम शाळाही आहे.
३०० वर्ष जुने देवस्थान
- हे देवस्थान ३०० वर्ष जुने आहे. या देवस्थानाचे मूळपुरुष सद्गुरू विष्णू (बंगाजी) काशीप भुरे हे मूळचे अदोस क्षेत्र म्हणजेच आदासा येथील रहिवासी. बालपणापासून त्यांना श्रीगणेशाच्या भक्तीचा ध्यास होता. वयाच्या बाराव्या वर्षीच साधना आणि तपश्चर्या केल्यानंतर आध्यात्मिक लोकजागृती करिता गुरू आदेशाने ते नागपूरला आले. शमीची पूजा करणे हा त्यांचा नित्यक्रम होता. रोज पूजन करून मध्यान्नकाळी ते वायुवेगाने आदासा येथे जाऊन गणपतीचे दर्शन घ्यायचे. काही काळाने प्रत्यक्ष अदोष गणपतीने त्यांना दृष्टांत दिला आणि शमीच्या बुंध्यापाशी प्रत्यक्ष मूर्ती प्रकट झाल्याची माहिती डॉ. भालचंद्र माधव हरदास यांच्या ब्लॉगवरून मिळते. विशेष म्हणजे, आजही तो पुरातन शमी वृक्ष येथे आहे.
नातू श्रीधुंडिराजपंत कावळे यांना दिले अधिकार
- श्रीभुरे महाराजांची नात ही कावळे घराण्यात दिली होती. पुढे शिष्य स्वरूपात भुरे बुवांचे नातू श्रीधुंडिराजपंत कावळे यांना स्वतः श्रीभुरे महाराजांनी या देवघराची परंपरा, भैरव दंड, शमीची माळ, तसेच येथील कुळाचार आणि उत्सव साजरा करण्याचे अधिकार प्रदान केले दिले. आजतागायत कावळे कुटुंब मनोभावे श्रीगणेशाचे पूजन, परंपरा, उत्सव मोठ्या आनंदाने पार पाडतात. सर्व मनोकामना पूर्ण करणारा हा सुखकर्ता भुरे गणपती हा जागृत असून नागपूरचे भूषण आहे.