लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागाने मंगळवारी शहरातील विविध भागातील २६६ अतिक्रमणांचा सफाया केला. या दरम्यान ४ ट्रक साहित्य जप्त करून ९६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. अतिक्रमण कारवाई करताना नेहरूनगर झोन क्षेत्रातील शक्तिमाता नगर येथे चरपे यांनी रस्त्यावर उभारलेल्या धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविताना पथकाला नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. त्यानंतर नंदनवन पोलीस स्टेशनचे कर्मचारी बोलावून संयुक्त कारवाई करण्यात आली.
धरमपेठ झोनमधील गोकुळपेठ बाजार परिसरातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूला फूटपाथवरील ३५ अतिक्रमणे हटविण्यात आली. हनुमाननगर झोनच्या पथकाने तुकडोजी पुतळा चौक ते मानेवाडा चौक, उदयनगर, म्हाळगीनगर दरम्यानच्या फूटपाथवरील ४० अतिक्रमणे हटविली. ६ हजार दंड वसूल केला. धंतोली झोनच्या पथकाने नरेंद्र नगर ते मनीष नगर दरम्यानच्या रस्त्यांच्या बाजूला असलेली ४२ अतिक्रमणे हटविली. २ ट्रक साहित्य जप्त करून ५ हजार दंड वसूल केला. तसेच झोन कार्यालय, गोंडवाना चौक, मनोरुग्णालय चौक, विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर रोड, फरस चौक आदी भागातील ५५ अतिक्रमणे हटविली. एक ट्रक साहित्य जप्त करून १५ हजार दंड वसूल केला.
...
गांधीबागने वसूल केला ७० हजार दंड
गांधीबाग झोनच्या पथकाने महाल भागातील शिवाजी पुतळा, गीतांजली टॉकीज, नंगा पुतळा, बडकस चौक ते इतवारी डाकघर दरम्यानच्या रस्त्यांवरील ठेले, दुकानांची ५२ अतिक्रमे हटविली. पथकाने ७० हजार दंड वसूल केला.
....
रात्रीलाही अतिक्रमण कारवाई
सतरंजीपुरा झोनमध्ये सोमवारी दुपारी ३ ते रात्री ११ पर्यंत मेहंदीबाग पूल ते राणी दुर्गावती चौक, चमार नाला, जुना भंडारा रोड, शहीद चौक, गांजाखेत, गोळीबार चौक, मस्कासाथ, नेहरू पुतळा, मारवाडी चौक, इतवारी रेल्वे स्टेशन दरम्यानच्या मार्गावरील ६६ अतिक्रमण हटविण्यात आले. या दरम्यान ७ ठेले, एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. अशाच प्रकारे लक्ष्मीनगर झोनमध्ये मंगळवारी कारवाई करण्यात आली. वर्धा रोड, लक्ष्मी विहार दीप अपार्टमेंट येथील राज ठाकूर यांनी पाकिंंगच्या जागेत केलेले अतिक्रमण हटविण्यात आले. फूटपाथवरील एक पानठेला तोडण्यात आला. त्यानंतर जेरील लॉक ते खामला रोड, छत्रपती चौक वर्धा रोड, अजनी चौक, रहाटे कॉलनी, लोकमत चौक, रामदासपेठ, काचीपुरा, बजाजनगर आदी भागातील ६५ अतिक्रमण हटवून दोन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.