कुही : नागपूर-आंभाेरा मार्गाची दुरुस्ती व रुंदीकरण करण्यात आले. कुही तालुक्यात या मार्गालगत झुडपे वाढली असून, ती रहदारीस अडसर ठरत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले. याकडे सार्वजिक बांधकाम विभागातील अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आराेपही त्यांनी केला आहे.
या मार्गालगत चिपडी ते ब्राह्मणी दरम्यान माेठ्या प्रमाणात झुडपे व गवत वाढले आहे. मैलाचे दगड सुद्धा त्यात गडप झाले आहेत. वळणावर समाेरून येणारे वाहन व्यवस्थित दिसत नसल्याने अपघात हाेत आहेत. मांढळ परिसरात या मार्गाचे एक किमी सिमेंटीकरण करण्यात आले. डाेंगरगाव, माळणी, आकाेली व कुहीजवळ राेडच्या दाेन्ही बाजूंनी नाल्या बांधण्यात आल्या. दुभाजकही तयार करून त्याचे साैंदर्यीकरण करण्यात आले. परंतु, मांढळ येथे ना नालीचे बांधकाम करण्यात आले ना दुभाजक तयार केले. या ठिकाणी विद्युत खांब लावण्यात न आल्याने पथदिव्यांची देखील साेय केली जाणार नसल्याचे स्पष्ट हाेते.
या राेडचे पॅचेस भरण्याचे साैजन्यही बांधकाम विभागाने अद्याप दाखविले नाही. त्यामुळे हा भाग अपघातास कारणीभूत ठरत आहे. कंत्राटदाराने मध्येच काम साेडून पळ काढला असून, नागरिकांनी या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. यात भ्रष्टाचार झाल्याचा आराेप करीत चाैकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
...
खाेलगट भाग धाेकादायक
या मार्गावरील कुही ते चिपडी दरम्यानच्या पाच किमी राेडच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यात राेडची उंची वाढविण्यात आली आहे. या मार्गावर जिनिंग ते राईस मिल दरम्यान दाेन ठिकाणी खाेलगट भाग आहे. वाहने चालविताना या दाेन्ही खाेलगट भागात जबर धक्का लागत असल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटून अपघात हाेण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे हा भाग समतल करणे गरजेचे आहे.