नरेश डोंगरे, नागपूरवैदर्भीय शुभम लोणकर हा खतरनाक बिश्नोई गँगच्या वर्षभरापूर्वीपासून सलग संपर्कात होता. जानेवारी २०२४ मध्येच ही धक्कादायक माहिती विदर्भातील काही उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांना माहित झाली होती. दरम्यान, माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्याकांडामुळे पुन्हा एकदा चर्चेला आलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे विदर्भ कनेक्शन आता ९ महिन्यात दुसऱ्यांदा उघड झाल्यामुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
अकोला पोलिसांनी दोघांना केली होती अटक
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडानंतर प्रकाशझोतात आलेल्या लॉरेन्स बिश्नोईने अभिनेता सलमान खानला धमकी दिल्यापासून बिश्नोई टोळीचा गुन्हेगारी जगतात सर्वत्र बोलबाला सुरू झाला. त्यानंतर तपास यंत्रणांकडून त्याचे नेटवर्क तपासण्यात येत असतानाच १६ जानेवारी २०२४ ला दोन अग्निशस्त्रांसह (पिस्तुल) अजय देटे आणि प्रफुल्ल चव्हाणला अकोला पोलिसांनी अटक केली होती.
त्यावेळी शुभम लोणकरने हे पिस्तुलं त्यांना विकल्याचं उघड झाल्यानंतर शुभमला अटक करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासल्यानंतर अवघी तपास यंत्रणाच चाट पडल्यासारखी झाली होती.
लॉरेन्स बिष्णोईच्या भावाशी शुभम लोणकरचा संपर्क
उच्चपदस्थ सुत्रांनुसार, लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोई हा महाराष्ट्रासह दिल्ली एनसीआर आणि बिहारच्या गुन्हेगारी जगताचे नेटवर्क सांभाळतो. त्याच अनमोल बिश्नोईच्या शुभम लोनकर सातत्याने संपर्कात असल्याचे उघड झाले होते.
तो नियमित व्हॉटसअॅप, व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून विदर्भातील गुन्हेगारी वर्तुळातील घडामोडींची तसेच वेगवेगळ्या डीलची माहिती टोळीला पुरवित होता, हेदेखील उजेडात आले होते. ही धक्कादायक माहिती त्यावेळीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्येही चर्चेला आली होती.
आता बाबा सिद्दीकी हत्याकांडाची जबाबदारी शुभम लोणकरच्या आयडीवरून स्विकारण्यात आल्याने शुभम पुन्हा एकदा तपास यंत्रणांमध्ये चर्चेला आला आहे.
लॉरेन्स बिष्णोई गँगचे विदर्भात कोण, कोण?
खास सूत्रांच्या माहितीनुसार, लॉरेन्स गँगमधील इंटरनेटच्या किड्यांनी सोशल मीडियावर आपले जाळे विणले आहे. ते वेगवेगळे ग्रुप बनवून गुन्हेगारीचे आकर्षण असलेल्या तरुणांना या ग्रुपमध्ये सहभागी करून घेतात.
त्यांचे ब्रेन वॉश करून नंतर त्यांना वेगवेगळे आमिष दाखवून आपल्या टोळीत सहभागी करून घेतात. प्रारंभी छोटेमोठे, नंतर मोठा गुन्हा करून घेतला जातो. शुभमच्या रुपात हे उघड झाल्यानंतर आता लॉरेन्स टोळीचे नेटवर्क विदर्भात आणखी कुठे कुठे आहे, त्याचा शोध घेतला जात आहे.