लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनलॉकची प्रक्रिया सुरू करून टाळेबंदीमध्ये काही प्रमाणात शिथिलता देत नियमांच्या अधीन राहून मंगल कार्यालय, सभागृहामध्ये ५० वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्याला परवानगी देण्यात आली. मात्र या परवानगीला आता खूप उशीर झाला आहे आणि संबंधित क्षेत्राची पूर्ण साखळी विस्कटली असून झालेले नुकसान भरून निघणारे नाही, अशी खंत मंगल कार्यालय व्यावसायिकांनी व्यक्त केली.प्रशासनाने दिलेल्या नियमावलीनुसार मंगल कार्यालयात फिजिकल डिस्टन्स्ािंगचे पालन करत लग्नसोहळा आयोजित करण्यात येणार आहेत. मात्र या परवानगीला खूप उशीर झाला आहे. मंगल कार्यालय, लॉन व्यावसायिकांची लाखोंची कमाई बुडाली. शहरात दीड हजारावर मंगल कार्यालये आहेत. हजारावर सभागृह तर लॉनदेखील पाचशेवर आहेत. मंगल कार्यालयाचे कमीतकमी भाडे सरासरी ४० हजार ते लाखो रुपयांच्या घरात असते. लॉन आणि सभागृहाचीही स्थिती जवळपास सारखीच असते. भाड्याव्यतिरिक्त इतर शुल्क घेतले जाते. मात्र लग्न कार्यच झाले नसल्याने हे सर्व बुडाले. मंगल कार्यालयातील लग्न समारंभाशी जुळलेले कॅटरिंग व्यवसाय, बिछायत, बॅण्ड, घोडे यांचा व्यवसाय तसेच कार्यालयात काम करणारे कामगार, स्वयंपाकी यांचा रोजगार अशी पूर्ण साखळी कोलमडली. आता किमान वर्षभर तरी हे नुकसान भरून निघणार नाही, अशी व्यथा मंगल कार्यालय मालकांनी व्यक्त केली. परवानगी मिळण्यासाठी अनेकदा बैठक घेऊन शासन व प्रशासनाला निवेदने दिली. शासनाने परवानगी दिली, पण खूप उशीर केल्याची टीका व्यावसायिकांनी केली आहे.दरवर्षी याच सीझनमध्ये लाखोंची उलाढाल होत असते. मात्र यावर्षी पूर्ण सीझन खाली गेला. प्रशासनाने लोकांना घरी लग्न करण्याची परवानगी दिली व अनेकांनी ते उरकूनही घेतले. मात्र ९० टक्के लोकांच्या घरी एवढी जागा नसते, ज्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन झाले असेल का?. हीच परवानगी मंगल कार्यालय चालकांना दिली असती तर नियमांचे पालन झाले असते आणि थोडा का होईना व्यवसायही मिळाला असता.युवराज शिर्के, मंगल कार्यालय व्यावसायिकलहान कार्यालयांना प्राधान्य, दरही कमी केलेमोठ्या मंगल कार्यालयांचे भाडे ५० व्यक्तींसाठी परवडणारे नसल्याने लहान हॉल बुकिंग केले जात आहेत. जून महिन्यात २५, २९ व ३० या तीनच तारखांचे मुहूर्त शिल्लक होते व या दिवशी अनेकांनी लग्न उरकून घेतल्याची माहिती आहे. अनेक मंगल कार्यालयाच्या मालकांनी कार्यालयांचे दर १० ते १५ हजारांनी कमी केले आहे.
‘शुभमंगल’ला परवानगी मिळाली पण उशीर झाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 11:07 PM