अखेर काळच जिंकला : ब्लड कॅन्सरने झुंजणाऱ्या तरुणाचा मृत्यूनागपूर : अगदी तरुण होता तो. त्याला आता कुठे जग समजायला लागले होते. पण नियतीच्या मनात वेगळेच सुरू होते. त्याला ब्लड कॅन्सरने ग्रासले. अशा जीवघेण्या आजारातून शुभम सुखरूप घरी परतावा व पुन्हा आनंदाने कॉलेजमध्ये जावा यासाठी कुटुंबीयांनी नाही नाही ते प्रयत्न केले. जवळ असलेली मिळकत, आईचे दागिने आणि घरदारसुद्धा विकून टाकले. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेली त्याची तळमळ, दगदग आणि धावाधाव अखेर थांबली. शुभम अखेर हे जग सोडून गेला. शुभमची बहीण निकिता हिने लोकमतकडे आपली व्यथा मांडली होती. लोकमतनेही तिच्या आर्त हाकेची दखल घेत समाजातील दानदात्यांना मदतीचे आवाहन केले. शुभमच्या उपचारासाठी आता मदतीचा ओघ सुरूही झाला होता. मात्र काळ या मदतीसाठी थांबला नाही. त्याने अखेर शुभमला सोबत नेलेच.शुभम सुधाकर बांते या ब्लड कॅन्सरने झुंजणाऱ्या तरुणाने मंगळवारी पहाटे ४.३० च्या दरम्यान अखेरचा श्वास घेतला. आणि बहीण कोलमडलीच...आईच्या निधनानंतर शुभम आणि लहान बहीण निकिता एकमेकांच्या सुख-दु:खाचा आधार झाले होते. शुभमला आजार झाला तेव्हा ती त्याची आई, मैत्रीण, बहीण सर्वकाही झाली. आजार बळावला तेव्हा ओढणीने बांधून रुग्णालयात पोहचविणे, पुन्हा आॅफिसला जाणे. कधी तो दु:खी झाला की त्याला चित्रपट पहायला नेऊन हास्य फुलविण्याचे काम तिने केले. त्याच्या उपचारासाठी वडिलांसोबत जमतील तेवढे प्रयत्न तिने केले. मात्र मंगळवारी डॉक्टारांनी शुभम गेल्याचे सांगताच ती बेशुद्ध पडली. रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते आणि इकडे शुभमच्या अंत्ययात्रेची तयारी सुरू होती. भावाला एकदा पाहायचे म्हणून सलाईन काढून ती घरी गेली. अंत्ययात्रेच्यावेळी ती पुन्हा बेशुद्ध पडली. भाऊ आता कधी दिसणार नाही या विचाराने ती मनातून खचली आहे. वडिलांच्याही वेदना मूक झाल्या आहेत.
शुभम गेला उशीर झाला !
By admin | Published: September 21, 2016 2:58 AM