स्थानिक कंत्राटदारांना प्राधान्य : स्थायी समितीची मंजुरीनागपूर : राज्य सरकार, नासुप्र व महापालिकेच्या संयुक्त भागीदारीतून नागपूर शहरात ३२४ कोटींचे सिमेंट क ाँक्रिटचे रस्ते निर्माण केले जाणार आहे. परंतु पहिल्या टप्प्याला कंत्राटदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत सिमेंट रोडच्या निविदा नियमात फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.५५ रस्त्यांचे २२ पॅकेजमध्ये काम करण्यात येणार आहे. यातील सहा पॅकेजच्या निविदा काढण्यात आल्या होया. परंतु याला कंत्राटदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महापौर व आयुक्तांनी आपल्या स्तरावर यामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. कंत्राटदारांच्या संघटनेसोबतच चर्चा केली. कंत्राटदारांनी निविदा नियमात फेरबदल करण्याची मागणी केली. आधी कंत्राटदार दोन पॅकेजसाठी निविदा सादर करू शकत होते. आता त्यांना चार पॅकेजसाठी निविदा भरता येईल. तसेच या कामासाठी सिमेंट रस्त्यांच्या कामाचा पाच वर्षांचा अनुभव आवश्यक होता. ही अट शिथिल करून सिमेंट रस्त्यांचे काम चार टप्प्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला. सिमेंट रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण व्हावे, यासाठी १५ दिवसात निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यादेश देण्यात येईल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी दिली. १९९६ ते २००० या कालावधीत शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्त्यांची कामे करण्यात आली होती. त्यानंतर सिमेंट रस्ते बनविण्यात आलेले नाही. त्यामुळे स्थानिक कंत्राटदारांसाठी नियमात फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(प्रतिनिधी)
सिमेंट रोडच्या निविदा नियमात फेरबदल
By admin | Published: February 10, 2016 3:32 AM