नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भंडारा येथील न्यू ईरा मोटर्स शोरुममध्ये झालेल्या २८ लाख ४३ हजार रुपयांच्या अफरातफर प्रकरणात आरोपी रोखपाल अरविंद वीरेंद्र शुक्ला व सहायक रोखपाल सुरेंद्र शालिकराम किनेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास नकार दिला. न्यायमूर्ती विनय जोशी यांनी हा निर्णय दिला.
आरोपींनी ऑक्टोबर-२०१९ ते फेब्रुवारी-२०२१ या काळात ग्राहकांकडून ४० लाख ८३ हजार ९७९ रुपये स्वीकारले. पण शाेरुमच्या बँक खात्यात केवळ १२ लाख ४० हजार ५२० रुपये जमा केले, अशी तक्रार शाेरुमचे प्रमुख हुसैन फिदा अली फिदवी यांनी पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. त्यावरून या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींना सुरुवातीला सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो अर्ज फेटाळण्यात आला. फिर्यादीतर्फे ॲड. नीरज जावडे यांनी कामकाज पाहिले.