रिॲलिटी चेक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यापासून नागपुरात धुळवडीपासूनच अंशत:, मग सौम्य आणि नंतर कठोर निर्बंधासह लाॅकडाऊन सुरू आहे. त्या अनुषंगाने बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश आहेत. या गोष्टीला व्यापाऱ्यांनी पूर्वीपासूनच विरोध दर्शवला होता. मात्र, थेट मार्गाने शासन नियमाचे उल्लंघन करता येत नाही, ही बाब माहीत असल्याने आणि रोजगाराची विवंचना, ढासळलेली आर्थिक स्थिती आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दुकानदार शासनाच्या आदेशाला अप्रत्यक्षरीत्या ठेंगा दाखवत आहेत. इतवारी असो, महाल, सक्करदरा की सीताबर्डी सर्वच बाजारपेठांमध्ये दुपारी १२ वाजतापासून ‘शटर बंद, दुकान चालू’ असे चित्र सर्रास दिसून येत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत दीर्घकाळ लाॅकडाऊनने व्यापार कोलमडला आहे. लाट ओसरताना अनलॉक प्रक्रियेत व्यापाराला उभारी देण्याचे प्रयत्न सुरू असतानाच फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा संक्रमण उफाळले आणि दुसऱ्या लाटेने उग्र रूप धारण केले. संसर्गाला शमविण्यासाठी शासनापुढे पुन्हा एकदा लाॅकडाऊन लादण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. त्याअनुषंगाने नागपुरात होळीपासून सौम्य निर्बंध लागू झाले आणि १५ एप्रिलपासून राज्यात कठोर निर्बंधासह लाॅकडाऊनची घोषणा झाली. आधीच व्यापार डबघाईला आला होता आणि त्यात पुन्हा लागू झालेल्या या निर्बंधाने व्यापारीवर्ग हतबल झाल्याची चिन्हे होती. मात्र, संक्रमणापुढे अनुत्तरित असल्याने निर्बंध मान्य करण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, आता दीड-दोन महिन्यात स्थिती बिकट झाल्याची चिन्हे बघता बाजारपेठांमध्ये दुकाने शटर बंद करून सुरू ठेवली जात असल्याचे चित्र आहे. कापडाची दुकाने असो, भांडी-कुंडी असोत की सराफा, सर्वच दुकाने बाहेरून बंद आणि आतून सुरू असल्याचे दिसून येते.
----
मार्केट परिसरात दुकानदार असतात तयारीनिशी उभे
शहरातील सर्वच मार्केट परिसरातील दुकानांसमोर दुकानदार पूर्ण तयारीनिशी उभे असतात. कुणाला काही हवे असल्यास संबंधित क्रमांकावर संपर्क साधावा, असे अस्थायी बोर्ड टांगण्यात आलेले आहेत. येणारा-जाणारा त्या क्रमांकावर संपर्क साधताच दुकानदार सज्ज असतात. तात्काळ शटर उघडून ग्राहकांना आत घेतले जाते आणि व्यवहार आटोपला जातो, असे चित्र ठिकठिकाणी दिसून येते.
-----------------
टेहळणीसाठीही कर्मचाऱ्यांची नियुक्ती
मनपाचे कोविड पथक किंवा पोलिसांच्या गस्तीवर नजर ठेवण्यासाठी या दुकानदारांनी सामूहिकरीत्या आपल्याच कर्मचाऱ्यांची आळीपाळीने नियुक्ती केलेली असते. शंका येताच हे कर्मचारी तात्काळ बाहेर उभे असलेल्या कर्मचाऱ्यांना शटरला कुलूप ठोकण्याचे संकेत देतात. कधी कधी प्रचंड पळापळही होताना दिसते.
---------------
११ पर्यंतची परवानगी असलेलेही करत आहेत उल्लंघन
किराणा, बेकरी, दूध डेअरी यांना सकाळी ११ वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. ११ नंतर दुकाने बंद करण्याचे निर्देश आहेत. मात्र, हे दुकानदारही वाहत्या पाण्यात हात धूत असल्याचे चित्र आहे.
-------------
आता उपाशी मरण्याची वेळ आली आहे
संक्रमण आणि टाळेबंदी जीवघेणी ठरत आहे. नियमांचे पालन करण्याची आमची जबाबदारी आहे. मात्र, आता संक्रमणापेक्षा उपासमारीने मरण्याची वेळ आली आहे. आणखी किती दिवस दुकाने बंद ठेवायची. त्यामुळे, हा असा मार्ग स्वीकारावा लागत आहे.
- एक दुकानदार