मनपाच्या विशेष सभेत प्रस्ताव : मंजुरीनंतर शासनाला पाठविणार नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेल्या सीताबर्डी येथील जुने श्याम हॉटेलला ‘डॉ. आंबेडकर राष्ट्रीय संरक्षित स्मारक’ घोषित करण्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या ३१ डिसेंबरच्या विशेष सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. सभागृहाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार श्याम हॉटेलच्या भूखंडाची लीज समाप्त करून संबंधित इमारतीचा मोबदला देऊन ती महापालिकेच्या ताब्यात घेण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली जाणार आहे. लोकमतने मनपा आणि राज्य सरकारकडे या विषयाबाबत यापूर्वी लक्ष वेधले होते. गेल्या पाच वर्षांपूर्वी महापालिकेत नागपूर विकास आघाडीची सत्ता आल्यानंतर ३० एप्रिल २०१२ च्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव पारित करून श्याम हॉटेलला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यात यावे, अशी मागणी शासनाकडे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. हा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केल्यानंतर पर्यटन व सांस्कृतिक विभागाने टिप्पणीत नमूद केल्यानुसार श्याम हॉटेलला राष्ट्रीय संरक्षित स्मारक घोषणा करण्याची सूचना या प्रस्तावातून केली आहे. विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात महसूल मंत्र्यांनी श्याम हॉटेलला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता तातडीने करण्यासाठी नगरविकास विभागाने महापालिकेला सुधारित प्रस्ताव सभागृहाच्या मंजुरीने शासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हा प्रस्ताव सभागृहापुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आलेला आहे. (प्रतिनिधी) वीजनिर्मिती प्रकल्पाचा प्रस्ताव शहरातून निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून त्यापासून भांडेवाडी येथे ११.५ मेगावॅट क्षमतेचा वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पावर ३०८ कोटींचा खर्च येणार आहे. अडीच वर्षांत हा प्रकल्प उभारला जाणार आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी या प्रस्तावाला बहुमताने मंजुरी देण्यात आली होती. हा प्रस्ताव मंजुरीसाठी सभागृहापुढे ठेवण्यात आला आहे. महापालिकेची ही शेवटची सभा असल्याने वीज प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी सभागृहाकडे पाठविण्यात आला आहे.
श्याम हॉटेल होणार ‘डॉ. आंबेडकर राष्ट्रीय संरक्षित स्मारक’
By admin | Published: December 29, 2016 2:31 AM