आॅनलाईन लोकमतनागपूर : भारतीय परंपरेमध्ये ईश्वर भक्ती व मोक्षप्राप्तीची संकल्पना सर्वोच्च मानली जाते. मोक्षप्राप्ती व सुख समाधानासाठी गुरू असणे महत्त्वाचा आहे, ही एक अंध संकल्पना लोकांच्या मनात रुजली आहे. मग मानलेल्या गुरूला श्रेष्ठ मानावे, त्याचे शब्द प्रामाण्य मानावे, भक्तीवर शंका घेऊ नये आणि चिकित्सा करू नये, या गोष्टी भक्तांना पाळाव्या लागतात. अशावेळी अध्यात्माच्या नावाने गुरूचे शब्द प्रमाण मानले जाते व चिकित्सा करण्याचे स्वातंत्र्य आपण गमावतो तेव्हा श्रद्धेचे रूपांतर अंधश्रद्धेत होते, असे ठाम मत अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी व्यक्त केले.अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया आणि जादूटोणा विरोधी कायदा’ या विषयावर प्रा. श्याम मानव यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले. रघुजीनगर येथील कामगार कल्याण मंडळाच्या सभागृहात आयोजित व्याख्यान कार्यक्रमात अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी, अभा अंनिसचे कार्याध्यक्ष उमेश चौबे, महासचिव हरीश देशमुख, सुरेश झुरमुरे, कामगार विकास अधिकारी अरुण कापसे, विजय मोकाशी, छाया सावरकर आदी मान्यवर उपस्थित होते.आपल्या अडीच तास चाललेल्या दीर्घ व्याख्यानात चमत्काराच्या प्रात्यक्षिकासह अनेक ढोंगीबाबांचा बुरखा फाडला. या जगात कुणालाही चमत्कार करता येऊ शकत नाही. कालही करता येत नव्हते आणि उद्याही करता येणार नाही. त्याप्रमाणे कुणी देवत्वही प्राप्त करू शकत नाही. मात्र आपल्याला लहानपणापासून धर्माच्या, संस्कृतीच्या नावाने वेगळेच संस्कार दिले जातात. भजन, कीर्तन आणि ईश्वर भक्तीने प्रत्येक माणूस देव बनू शकतो. अशी सिद्धी प्राप्त करणारा चमत्कार करू शकतो, असे मनात बिंबवले जाते. त्यामुळेच अशी सिद्धी प्राप्त करण्याचा दावा करणारे सामान्य आणि सुशिक्षितांचाही गैरफायदा घेतात. त्यामुळे हे संस्कारच पुढे चालून अंधश्रद्धेचे कारण ठरते. अशा बुवा बाबांना गुरू मानून नियमाप्रमाणे त्याला सर्वस्व समर्पित केले जाते. असे बाबा मुख्यत्वे स्त्रियांना आपले लक्ष्य बनवितात. मोक्षाचे गाजर दाखवितात आणि महिलांचे लैंगिक शोषण करतात. अशा अनेक बाबांनी हजारो स्त्रियांना नादी लावले आहे. अशिक्षितच व सामान्यच नाही तर उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू लोकही अशा बुवांच्या भूलथापांचे बळी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
श्याम मानव म्हणतात, चिकित्सा संपली की श्रद्धेचे रूपांतर होते अंधश्रद्धेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:24 AM
आॅनलाईन लोकमतनागपूर : भारतीय परंपरेमध्ये ईश्वर भक्ती व मोक्षप्राप्तीची संकल्पना सर्वोच्च मानली जाते. मोक्षप्राप्ती व सुख समाधानासाठी गुरू असणे महत्त्वाचा आहे, ही एक अंध संकल्पना लोकांच्या मनात रुजली आहे. मग मानलेल्या गुरूला श्रेष्ठ मानावे, त्याचे शब्द प्रामाण्य मानावे, भक्तीवर शंका घेऊ नये आणि चिकित्सा करू नये, या गोष्टी भक्तांना पाळाव्या ...
ठळक मुद्देसंस्कारामधूनच होते अंधश्रद्धेचे बीजारोपण