लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वडिलोपार्जित मालमत्तेच्या वादातून सख्खे बहिण-भाऊ वैरी बनले. त्यांनी आपल्या छोट्या भावावर तसेच त्याच्या पत्नीवर हल्ला चढवून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास नंदनवनमध्ये ही घटना घडली.
जखमी अवस्थेत उपचार घेत असलेले दिलीप सखाराम गडरिया (वय ४०) यांनी नंदनवन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वडिलांचे हिवरी नगरात तीन खोल्यांचे घर आहे. दिलीप यांना श्यामराव आणि शोभा हे भाऊ तसेच बहीण आहे. या तिघांमध्ये वडिलांच्या घराच्या हिस्से वाटणी वरून नेहमीच वाद होतो. सोमवारी रात्री याच मुद्द्यावरून बहीण भावात वाद सुरू झाला. त्यानंतर श्यामराव आणि शोभा या दोघांनी संगणमत करून दिलीपच्या डोक्यावर लाकडी फळीने जोरदार फटका मारला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. दिली दिलीप यांची पत्नी पतीच्या मदतीला धावल्याचे पाहून आरोपीने तिच्याही डोक्यावर लाकडी फळीने फटका मारला. त्यामुळे दिलीप आणि त्याची पत्नी गंभीर जखमी झाले. आजूबाजूची मंडळी धावली. त्यांनी आरोपींना कसेबसे आवरले. जखमी दाम्पत्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच नंदनवन पोलिस रुग्णालयात पोहोचले. त्यांनी दिलीपचे बयान नोंदवून घेत आरोपी शामराव सखाराम गडरिया (५१) आणि त्याची बहीण शोभा (वय ४८) या दोघांविरुद्ध हत्या करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.