काटाेल : स्थानिक ग्रामीण रुग्णालयात सिकलसेल मार्गदर्शन कार्यक्रमाचे नुकतेच आयाेजन करण्यात आले हाेते. यात तज्ज्ञ डाॅक्टरांनी या आजार व त्यावरील उपचाराबाबत विस्तृत माहिती दिली.
हा अनुवांशिक व रक्तातील लाल पेशींचा आजार आहे. साधारणत: शरीरात लाल पेशी गोलाकार असतात. पण, सिकलसेलमुळे या पेशींना ऑक्सिजन मिळात नसल्याने या पेशींचा आकार विळासारखा होतो. त्यामुळे या आजाराला ‘सिकल सेल’ असे संबाेधले जाते. रक्तांच्या तपासणीअंती या आजाराचे निदान केले जाते. या सर्व तपासण्या काटाेल येथील ग्रामीण रुग्णालयात विनामूल्य केल्या जातात. सिकलसेल पीडित (एसएस) व सिकलसेल वाहक (एसए) असे या आजाराचे दोन प्रकार आहे. या आजारामुळे शरीरावर गंभीर परिणाम जाणवतात. रुग्णांना वारंवार रक्त लावावे लागते. या आजाराच्या नियंत्रणासाठी रक्त तपासून विवाह करावा. हा आजार खोकला, दूषित पाणी प्यायल्याने, डास चावल्याने व व्यक्तीमधील संपर्काने होत नाही. हा आजार विशिष्ट जातींमध्ये होताे, हा गैरसमज आहे, असेही डाॅक्टरांनी मार्गदर्शनात सांगितले. याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश डावरे, डॉ. सुधीर वाघमारे, डॉ. अभिलाष इकलारे, डॉ. पुंड, डॉ. पखाले, अधिपरिचारिका मसराम, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुदर्शन देवघरे, पूनम बगवे, प्रीती शिरपूरकर जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर कोल्हे, शब्बीर शेख, संदीप वंजारी, अजय लाडसे, रुपेश नाखले उपस्थित होते.