मेडिकलमधील प्रकार : औषधेही मिळेना लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सिकलसेलच्या रुग्णांना नि:शुल्क औषधे व रक्त उपलब्ध करून देण्याचा शासनाचा निर्णय असताना मध्यभारतातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या मेडिकलमध्ये सिकलसेलच्या रुग्णाला रक्तासाठी वेळेवर धावाधाव करण्याची वेळ येते. रुग्णालयात आवश्यक औषधेही मिळत नसल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणारा आजार म्हणून सिकलसेल ओळखला जातो. एकीकडे मृत्यूचे भय तर दुसरीकडे अवहेलना या कात्रीत या आजाराचे रुग्ण सापडले आहे. यातच आता शासकीय रुग्णालयही या आजाराच्या रुग्णांना सावत्र वागणूक देत असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी सिकलसेलबाधित एक युवती आपल्या वडिलांसोबत मेडिकलमध्ये आली. डॉक्टरांनी तपासून ‘एबी’ पॉझिटीव्ह रक्तगटाच्या दोन पिशव्या रक्त चढविण्यास सांगितले. युवतीचे वडील मेडिकलच्या रक्तपेढीमध्ये गेल्यावर सुरुवातीला तेथून नकार मिळाला, परंतु मेडिकलच्याच एका ओळखीच्या डॉक्टरांनी यासाठी प्रयत्न केल्यावर दिवसभराच्या प्रतीक्षेनंतर सायंकाळी एक पिशवी रक्त मिळाले, परंतु दुसरी पिशवी मिळविण्यासाठी त्यांच्यासमोर प्रश्न होता. ‘लोकमत’शी बोलताना रुग्णाच्या वडिलांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, गेल्या काही वर्षांपासून मेडिकलमध्ये मुलीवर उपचार सुरू आहे. परंतु दरवेळी रक्तासाठी धावाधाव किंवा कुणाची तरी ओळख दाखवावी लागते, त्या शिवाय रक्त मिळत नाही. या आजाराच्या लक्षणांची तीव्रता कमी करण्यासाठी ‘हायड्रॉक्सिल युरिया’ व ‘सोडामिंट कॅप झिंकॉलेक’ सारखी काही औषधे घ्यावी लागतात. मात्र मेडिकलमध्ये ही औषधे मिळत नाही. बाहेर ही औषधे खूप महागडी असल्याने पदरमोड करावी लागते.
सिकलसेल रुग्णाची रक्तासाठी धावाधाव
By admin | Published: June 11, 2017 2:47 AM