कामठी : आई व वडील दाेघेही सिकलसेल वाहक असल्याने हा आजार अपत्याला संक्रमित हाेऊ शकताे. त्यामुळे या आजाराचा प्रसार टाळण्यासाठी सिकलसेलग्रस्तांनी आपसात विवाह करणे टाळावे. शिवाय, विवाहापूर्वी दाेघांनीही सिकलसेलची तपासणी करवून घ्यावी असे आवाहन डाॅ. शबनम खानुनी यांनी सिकलसेल नियंत्रण सप्ताहाच्या शुभारंभाप्रसंगी केले.
कामठी नगर परिषदेच्यावतीने शहरात राष्ट्रीय नागरी प्राथमिक आराेग्य अभियानांतर्गत तालुका आराेग्य विभाग, शासकीय उपजिल्हा रुग्णालय व नागरी प्राथमिक आराेग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सिकलसेल नियंत्रण सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहाच्या शुभारंभाप्रसंगी नगराध्यक्ष मोहम्मद शाहजहा शफाअत, पालिका उपाध्यक्ष शहिदा कलीम अन्सारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय माने, वैद्यकीय अधीक्षका डाॅ. नैना धुमाले, डॉ. श्रद्धा भाजीपाले, काशिनाथ प्रधान, नगरसेविका वैशाली मानवटकर उपस्थित होते. या सप्ताहांतर्गत दि. ११ ते १७ डिसेंबर या काळात सिकलसेलग्रस्त व सिकलसेलवाहक रुग्णांची मोफत आराेग्य तपासणी, यकृत (लिव्हर), हिमोग्लोबिन, ब्लड ग्रुप आदींची तपासणी केली जात आहे.
सिकलसेल रुग्णांना विविध शासकीय सुविधांसाेबतच संजय गांधी निराधार योजनेंतर्गत एक हजार रुपयांची मदत देणे, महात्मा फुले जीवनदायी योजनेचा लाभ देणे, सिकलसेलग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षेच्यावेळी प्रति तास २० मिनिटे अतिरिक्त वेळ देणे, महाविद्यालयीन व बोर्डाच्या परीक्षेच्यावेळी लेखनिकांची मदत करणे, उपचारादरम्यान सिकलसेल रुग्ण व त्याच्या एका मदतनीसास मोफत एसटी प्रवास यासह अन्य सुविधांची माहिती दिली जात असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय माने यांनी सांगितले. यशस्वितेसाठी सुषमा दिवाणजी, सत्यप्रभा मेंढे, सुनीता तिजारे, स्विटी रामटेके, शुभांगी भोकरे, प्रियंका जंगी, नीलम खोब्रागडे, रंजना काैरती सहकार्य करीत आहेत.