अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई : विविध शहरांतील २० कोटींची संपत्ती घेतली ताब्यातलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बँक आॅफ महाराष्ट्रचे कर्ज बुडविणाऱ्या आणि काळा पैसा पांढरा करणाऱ्या सिद्धिविनायक लॉजिस्टिक कंपनीची नागपूर, सूरत, मुंबई, पुणे, ठाणे, उदयपूर व दादरा नगर हवेली येथील एकूण १९ कोटी ६२ हजार रुपयांची संपत्ती अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केली आहे. त्यात नागपुरातील ७५ लाख ६ हजार रुपये किमतीच्या जमिनीचा समावेश आहे.ही कंपनी सूरत येथील असून कंपनीचा प्रमोटर व मेंटर रूपचंद बैद या गैरव्यवहाराचा मास्टर मार्इंड आहे. बैद व अन्य पदाधिकाऱ्यांनी बँक आॅफ महाराष्ट्रची ८३६.२९ कोटी रुपयांनी फसवणूक केली आहे. २०१३ पासून बैदने बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेकडून विविध प्रकारचे कर्ज घेतले. त्यात ‘चालक से मालक’ योजनेसाठी २८०४ वाहन चालकाच्या नावाने घेतलेल्या कर्जाचा समावेश आहे. अंमलबजावणी संचालनालय नोव्हेंबर-२०१६ पासून या प्रकरणाची चौकशी करीत आहे. बैदच्या सूचनेवरून बँक आॅफ महाराष्ट्रने मुंबईतील अॅडव्हान्स मेटल कॉर्पोरेशन कंपनीला ११७.६ तर, अॅडप्लस डिस्ट्रिब्युटर्स कंपनीला १३०.६ कोटी रुपयांचे कर्ज दिले. ही रक्कम शेवटी सिद्धिविनायक लॉजिस्टिक कंपनी व संचालकांनी अज्ञात उद्देशाकरिता वापरली. बैदने कर्जाच्या रकमेतून सूरत येथे हॉटेल खरेदी केले. तो विविध मार्गाने काळा पैसा पांढरा करीत होता. त्याला २० एप्रिल २०१७ रोजी अटक करण्यात आली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
सिद्धिविनायक कंपनीची नागपुरातील जमीन जप्त
By admin | Published: June 09, 2017 2:26 AM