सरकारकडे शिफारस : पोलीस महासंचालकांची माहिती नागपूर : पदोन्नतीवर बदली होऊनही नक्षलविरोधी अभियानात रुजू न झालेले विशेष पोलीस महानिरीक्षक शैलेष शेलार यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी दिली. मंगळवारी दुपारी ते पोलीस आयुक्तालयात पत्रकारांशी बोलत होते. गेल्या महिन्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त व्ही. पाटणकर, सहआयुक्त संतोष रस्तोगी आणि नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम तसेच नक्षल विरोधी अभियानाचे महानिरीक्षक शिवाजी बोडखे यांची(आयजी एएनओ)बदली करण्यात आली. बदली झालेले अधिकारी नागपुरातून निघून गेले. मात्र, एएनओसारख्या महत्त्वाच्या पदावर बदली होऊनही शैलेष शेलार रुजू झाले नाही. त्यामुळे बोडखे अडकून पडले. परिणामी येथील अत्यंत महत्त्वाचे सहपोलीस आयुक्तपद रिक्त राहिले. (शनिवारी बोडखे यांनी सहपोलीस आयुक्तांचा पदभार स्वीकारला.) त्यामुळे शेलार यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची सरकारकडे शिफारस करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. रिक्त पदाच्या संबंधाने उपस्थित एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी राज्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाची(डीआयजी)११ पदे रिक्त असल्याचेही सांगितले. गडचिरोली जिल्ह्यात सूरजागडजवळ नक्षल्यांनी ७० ट्रक टिप्परची जाळपोळ केलेल्या प्रकरणाची चौकशी अंतिम टप्प्यात असून, यातील नक्षल्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल. गुप्तधनाच्या लालसेने अपहरण करण्यात आलेल्या दोन मांत्रिकांपैकी एकाची हत्या करण्यात आली. ऐनवेळी पोलीस पोहोचल्याने दुसऱ्या मांत्रिकाचा जीव वाचला. जाळपोळीनंतर ही घटना घडली. त्याचेही आरोपी अद्याप पोलिसांना सापडले नाही, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. यावेळी अतिरिक्त पोलीस महासंचालक (विशेष अभियान) बिपीनकुमार बिहारी, पोलीस महासंचालक डॉ. के. व्यंकटेशम, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आयजी शेलार यांच्याविरुद्ध कारवाईचे संकेत
By admin | Published: February 08, 2017 3:04 AM