लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्जमाफीची घोषणा झाली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाही. ते तातडीने जमा करण्यात यावे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या बोंडअळी पॅकेजमध्ये काटोल व नरखेड तालुक्यांचा समावेश करण्यात यावा. २०१४ या वर्षात देण्यात आलेल्या मदतीप्रमाणे गारपीटग्रस्तांना मदत देण्यात यावी. तूर व चण्याची शासनाने खरेदी सुरू करावी. शेतीमालाला हमीभाव देण्यात यावा. रेशनवर देण्यात येणारा मका बंद करून गहू देण्यात यावा, अशा विविध मागण्यांसंदर्भात ५१ हजार शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.भाजपा सरकारकडून घोषणा केल्या जातात, परंतु प्रत्यक्षात काहीच करीत नाही. शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांच्या न्याय्य मागण्यांसंदर्भात काटोल व नरखेड तालुक्यात अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. राज्यात २०१४ साली गारपीट झाली होती. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गारपीटग्रस्त भागाची पाहणी करून संत्रा,मोसंबीला प्रति एकरी ५० हजार, गहू, तूर, चणा व भाजीपाला पिकाला सरसकट प्रति एकरी ३० हजारांची मदत जाहीर केली होती. यावेळी किमान त्याधर्तीवर मदत द्यावी, अशी मागणी देशमुख यांनी केली.बोंडअळीमुळे काटोल व नरखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही या दोन्ही तालुक्यांना राज्य सरकाराच्या पॅकेजमधून वगळण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनानंतर पुन्हा सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले. परंतु अद्याप शेतकऱ्याच्या खात्यात मदत जमा झालेली नाही. अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची मदत जमा झालेली नाही. हमीभावाचे आश्वासन दिले होते. परंतु गेल्या चार वर्षात यावर कोणताही निर्णय झालेला नाही. हमीभावाने तूर व चणा खरेदीची घोषणा केली. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी अजूनही खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बंडू उमरकर, चंद्रशेखर चिखले, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दीपक मोहिते, पंचायत समितीचे माजी सभापती नरेश अरसडे,अनुप खराडे, बाजार समितीचे सभापती तारकेश्वर शेळके, राष्ट्रवादीचे काटोलचे अध्यक्ष गणेश चन्ने, युवक अध्यक्ष गणेश सावरकर आदी उपस्थित होते.
५१ हजार शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 11:36 PM
शेतीमालाला हमीभाव देण्यात यावा. रेशनवर देण्यात येणारा मका बंद करून गहू देण्यात यावा, अशा विविध मागण्यांसंदर्भात ५१ हजार शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
ठळक मुद्देअनिल देशमुख : शेतीमालाला हमीभाव व नुकसानग्रस्तांना मदतीची मागणी