नागपूर: गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकार पेट्रोल, डिझेल व गॅसची सातत्याने दरवाढ करीत आहे. याच्या निषेधार्थ मंगळवारी युवक काँग्रेसने कामठी रोडवरील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्या स्वाक्षरी घेत अभिनव आंदोलन केले. दरवाढीविराेधात राेष व्यक्त करुन केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या.
प्रदेश युवक काँग्रेसच्या निर्देशानुसार महागाईच्या विरोधात राज्यव्यापी स्वाक्षरी मोहिमेला नागपुरातूनही सुरुवात करण्यात आली. युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव अजित सिंग यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते दुपारी उत्तर नागपुरातील १० नंबर पूल, कामठी रोड येथील पेट्रोल पंपावर जमले. महागाईसाठी केंद्र सरकारचा निषेध नोदवित पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी आलेल्या लोकांचे नाव लिहून त्यांची स्वाक्षरी घेण्यात आली. काही युवकांनी सिलेंडरची प्रतिकृती उंचावून लक्ष वेधले. आंदोलनात रत्नाकर जयपुरकर, आसिफ शेख, आशिष मडपे, आमिर नुरी, सतीश पाली, नीलेश खोब्रागडे, सचिन वासनिक, चेतन तरारे, ज्योती खोब्रागडे, प्रफुल किरपाने, राकेश इखार, कुणाल निमगडे, अनिरुद्ध पांडे, चेतन मेश्राम, निशाद इंदूरकर, फरमान अर्ली, शेख शहनवाज, तपन बोरकर, सन्तोष खडसे, श्रीलज पांडे, निखिल सहारे आदींनी भाग घेतला.