लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे शैक्षणिक प्रणालीत आमूलाग्र बदल झाला असून, सध्या ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरू आहे. कोरोना ओसरल्यावरदेखील भविष्यातील आवश्यकता लक्षात घेता, उच्च शिक्षण संस्थांमध्ये ऑनलाईन शिक्षणावर भर देण्याची गरज असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त कण्यात येत आहे. हीच बाब लक्षात घेता, विद्यापीठ अनुदान आयोगाने पुढाकार घेतला असून, ४० टक्के अभ्यासक्रम ऑनलाईन माध्यमातून शिकविण्यासाठी ब्लेंडेड शिक्षण प्रणाली विकसित करण्यासाठी पावले उचलली आहेत. यासंदर्भात आयोगाने तज्ज्ञ समितीदेखील गठित केली आहे.
सद्यस्थितीत १०० टक्के शिक्षण ऑनलाईन माध्यमातून सुरू असून, परीक्षादेखील त्याच प्रणालीतून घेण्यात येत आहेत. परंतु यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अडचण येत आहे. परंतु भविष्यातील आव्हाने व गरज लक्षात घेता, देशातील सर्वच उच्च शिक्षण संस्थांमध्ये कोरोना ओसरल्यानंतर शिक्षणाची मिश्र प्रणाली विकसित करणे आवश्यक झाले आहे. यादृष्टीने आयोगाच्या बैठकीत विचार करण्यात आला. उच्च शिक्षण संस्थांमध्ये ४० टक्के अभ्यासक्रम ऑनलाईन माध्यमातून शिकविण्याची परवानगी दिली पाहिजे, असा यात सूर होता. यासाठी ऑनलाईन-ऑफलाईन अशी शिक्षणाची मिश्र प्रणाली व त्यादृष्टीने मापदंड निश्चित करणे आवश्यक आहे. त्यामुळे आयोगाने तज्ज्ञ समिती गठित केली आहे. मिश्र प्रणालीतून अध्यापन झाले तरी परीक्षा ऑफलाईन माध्यमातूनच घेण्यात यावी, अशी सूचना आयोगाने केली आहे. तज्ज्ञ समितीने मसुदा तयार केला असून, त्यासंदर्भात विविध गटांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत, अशी माहिती आयोगाचे सचिव प्रा. रजनिश जैन यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांना सुविधा देण्याची गरज
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या या पुढाकाराने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे. मात्र ग्रामीण भागातील व वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी त्यादृष्टीने सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. दुसरीकडे जर ही मिश्र अध्यापन प्रणाली लागू झाली तर शिक्षकांचे काम वाढणार आहे. ऑफलाईनसोबत ऑनलाईनदेखील शिकवावे लागेल व त्यादृष्टीने तयारी करावी लागेल. त्यामुळे आयोगाने नेमका मसुदा आणखी स्पष्ट करावा, असे एका पदव्युत्तर विभागप्रमुखाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.