लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : तालुका कृषी विभागाने तालुक्यातील खरीप पीक नियाेजन पूर्ण केले असून, यावर्षी सावनेर तालुक्यात कपाशीच्या क्षेत्रात घट हाेण्याची तर तुरीचे क्षेत्र वाढण्याची शक्यताही कृषी विभागाने या नियाेजन अहवालात व्यक्त केली आहे. गेल्या खरीप हंगामात कापूस व साेयाबीनचा वाढलेला उत्पादनखर्च व उत्पादनात आलेली कमालीची घट यामुळे शेतकरी तुरीच्या पिकाकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सावनेर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ५९, ९६६.१८ हेक्टर असून, यातील विहित क्षेत्र ४४,२९४.५१ हेक्टर आहे. यापैकी ४१,८०६ हेक्टरमधील विविध पिकांचे २०२१-२२ च्या खरीप हंगामासाठी नियाेजन करण्यात आले. या खरीप हंगामात सावनेर तालुक्यामध्ये २५,४६९ हेक्टरमध्ये कपाशी, १२,२०० हेक्टरमध्ये तूर, १,४५० हेक्टरमध्ये मका, ८१३ हेक्टरमध्ये साेयाबीन, २७५ हेक्टरमध्ये ज्वारी तर उर्वरित क्षेत्रात भाजीपाल्याच्या विविध पिकांचे नियाेजन करण्यात आले आहे. तालुक्यात कपाशी व साेयाबीनचे क्षेत्र काही प्रमाणात घटले असून, तुरीच्या क्षेत्रात थाेडी वाढ झाली आहे.
काही शेतकरी पेरणीची खूप घाई करीत असल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीयाेग्य पाऊस काेसळल्यानंतरच पेरणीला सुरुवात करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अश्विनी काेरे यांनी केले आहे. मजुरांची कमतरता व कीटकानाशकांच्या वाढलेल्या किमतींनी आधीच शेतकऱ्यांची डाेकेदुखी वाढविली आहे. त्यातच यावर्षी साेयाबीनच्या बियाण्यांची टंचाई निर्माण झाली असून, केंद्र शासनाने रासायनिक खतांच्या किमतीत दीडपटीने वाढ केली आहे. त्यामुळे सर्वच पिकांचा उत्पादनखर्च वाढणार असल्याने आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना या खर्चाचा ताळमेळ कसा लावावा, असा प्रश्न सतावत आहे.
...
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान
शेतकऱ्यांनी कमी कालावधीत येणाऱ्या कापाशीच्या वाणाची पेरणीसाठी निवड करावी. कपाशीची लागवड सरी वरंभा पद्धतीने करावी. साेयाबीनची पेरणी ही बियाण्यांची उगवणशक्ती तपासूनच करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अश्विनी काेरे यांनी केले असून, त्यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर साेयाबीन, धान, तूर, मूग, उडीदाचे बियाणे मिळणार असल्याचे सांगितले. यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची सूचनाही त्यांनी केली.
...
बियाण्यांचा तुटवडा
यावर्षी शेतकऱ्यांना साेयाबीन बियाण्यांच्या तुटवड्याला सामाेरे जावे लागणार आहे. बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने किमतीत वाढ हाेणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरी असलेल्या साेयाबीनच्या बियाण्यांचा वापर पेरणीसाठी करावा. तत्पूर्वी त्या बियाण्यांची घरीच उगवणशक्ती तपासून बघावी, असेही तालुका कृषी अधिकारी अश्विनी काेरे यांनी सांगितले असून, त्यांनी उगवणशक्ती कशी तपासून बघावी, याबाबत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले.
===Photopath===
150521\img-20210514-wa0190.jpg
===Caption===
प्रात्यक्षिक दाखवताना तालुका कृषी अधिकारी ए ए कोरे तथा कर्मचारी आणि शेतकरी दिसत आहे