नागपूर : आर्थिक व दुर्बल घटकातील गरजू विद्यार्थ्यांकरिता खासगी शाळांमध्ये शिक्षणहक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यंदा जानेवारी अर्धा संपला तरी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्याबद्दल जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला सूचना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही प्रवेश प्रक्रिया फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.
आरटीईअंतर्गत शैक्षणिक सत्र २०२०-२१ साठी राखीव २५ टक्के जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी शाळा नोंदणी प्रक्रियेविषयी जि.प.च्या शिक्षण विभागाला अद्याप कोणतीही सूचना प्राप्त झालेली नाही. दरवर्षी डिसेंबरमध्ये शाळा नोंदणी सुरु होऊन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रिया सुुरू होणार असल्याची अपेक्षा शाळांकडून व्यक्त केली जात होती. मात्र, अद्यापही शाळा नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याविषयी जि.प.च्या शिक्षण विभागाला कोणतीही सूचना मिळालेली नाही. गेल्या सत्रात आरटीईची प्रवेश प्रक्रिया मार्च महिन्यापर्यंत लांबल्यामुळे प्रत्यक्ष आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया तब्बल सप्टेंबरपर्यंत सुरू होती. त्यामुळे पहिल्या टप्प्यात प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांनी ज्या शाळेत प्रवेश मिळेल तेथेच प्रवेश निश्चित करून घेतल्यामुळे आरटीईअंतर्गत जिल्ह्यात अनेक जागा रिक्त राहिल्या. सध्या खासगी शाळेच्या नर्सरी व पहिल्या वर्गासाठी जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत.