लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय रुग्णालयांना औषधे व इतर साहित्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी हाफकिन कंपनीची आहे. परंतु २०१७-१८ पासून कंपनीकडून औषधीच मिळाल्या नाहीत. यातच अधिष्ठात्यांकडून स्थानिक खरेदीचे अधिकार काढून घेतल्याने शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय (डेंटल)अडचणीत आले आहे. भूल देण्याच्या औषधांपासून ते हॅण्डग्लोव्हज, सर्जिकल ब्लेडचा तुटवडा आहे. परिणामी, रुग्णांना विना उपचार परत जावे लागत आहे. धक्कादायक म्हणजे, मुख शल्यक्रियाशास्त्र विभागावर उपचाराचे साहित्यच नसल्याचे फलकच लावण्याची वेळ आली.
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात केवळ विदर्भच नाहीतर आजूबाजूच्या राज्यांतूनही रुग्ण येतात. दरम्यानच्या काळात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रुग्णांची संख्या कमी झाली होती. आता कोरोना आटोक्यात येताच पुन्हा रुग्णांची संख्या वाढली आहे. यामुळे साहित्याअभावी रुग्णालय अडचणीत आले आहे. प्राप्त माहितीनुसार, २०१७-१८ या वर्षात रुग्णालयाला औषधी व इतर साहित्य खरेदीसाठी १५ लाख मिळाले होते. रुग्णालयाने हा निधी हाफकिन कंपनीकडे वळता केला. परंतु कंपनीला औषधांची खरेदीच करता आली नाही. यामुळे रुग्णालय प्रशासनाने २०१८-१९ या वर्षात मिळालेल्या निधीतून स्थानिक स्तरावर खरेदीची प्रक्रिया राबवली. यावर शासनाने आक्षेप घेतला. रुग्णालय प्रशासनाला नोटीसही बजावली. आता २०१९-२० वर्षातील निधी आला आहे. परंतु हाफकिनला निधी देऊनही खरेदी प्रक्रिया होत नसल्याने स्थानिकस्तरावर खरेदीचे अधिकार देण्याची परवानगी रुग्णालयाने मागितली आहे. परंतु अद्यापही उत्तर आलेले नाही. हाफकिन साहित्य देत नाही तर शासन खरेदीचे अधिकार देत नसल्याने रुग्णालय चालविणे अडचणीचे जात असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा नियोजन समितीचा निधी केवळ कोविडसाठी
जिल्हा नियोजन समितीचा निधी शासकीय दंत रुग्णालयाला मिळावा, यासाठी रुग्णालय प्रशासनाने प्रयत्न केले. परंतु हा निधी सध्यातरी केवळ कोविड रुग्णालयांसाठी वापरण्याच्या सूचना असल्याने दंत रुग्णालयाच्या हाती निराशा आली आहे.
रोज पाच हजाराची खरेदी
वर्षाला साडेचार लाखांचीच खरेदी करण्याचे अधिकार अधिष्ठात्यांना आहेत. यातही रोज पाच हजार रुपयांवर खरेदी करता येत नाही. आवश्यक साहित्य व औषधांसाठी संबंधित विभागाला नुकताच हा निधी दिला आहे. या शिवाय, जिल्हाधिकाऱ्यांकडून सात लाखांचा निधी मिळाला असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. यातून औषधी, हॅण्डग्लोव्हज, मास्क व इतरही साहित्याची खरेदी केली जाईल.
डॉ. मंगेश फडनाईक
अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय